Shreya Ghoshal Video :श्रेया घोषाल ही बॉलीवूडची लोकप्रिय गायिका आहे. तिनं केवळ बॉलीवूडच्याच नव्हे, तर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठीही अनेक गाणी गायली आहेत, ज्यामुळे चाहत्यांचे कान तृप्त होतात. श्रेया घोषाल ही तिच्या सुमधुर गायनानं कायमच रसिक श्रोत्यांचं मनोरंजन करत आली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती अनेक ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करीत असते.

भारतात आणि भारताबाहेरील तिच्या सांगीतिक मैफिलींना प्रचंड गर्दी होताना दिसते. श्रेयाच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच तिच्या लाइव्ह कार्यक्रमाचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच श्रेयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे ती अनेकांच्या कौतुकासही पात्र ठरली आहे.

वरिंदर चावला या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात गायिका श्रेया घोषाल गरोदर महिला चाहतीच्या पोटातील बाळासाठी गाणं गाताना दिसत आहे. गायिकेनं महिलेच्या पोटावर हात ठेवला असून, ती पोटातील बाळासाठी ‘पियू बोले’ हे लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

श्रेया घोषाल व्हायरल इन्स्टाग्राम व्हिडीओ

श्रेया सध्या अ‍ॅमस्टरडॅम येथे तिच्या गाण्यांच्या कार्यक्रमासाठी गेली आहे. तिथे श्रेयाला एका महिला चाहतीनं तिच्या पोटातील बाळासाठी गाणं गाण्याची खास विनंती केली. चाहतीच्या या विनंतीला श्रेयानंही मान देत, तिच्या पोटातील बाळासाठी गाणं गायलं. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे श्रेयानं आईच्या मायेनं महिलेच्या पोटावर हात ठेवला आणि बाळासाठी ‘पियू बोले’ हे गाणं गायलं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “याला म्हणतात कलाकार”, “ते न जन्मलेलं बाळ किती भाग्यवान आहे”, “तुझ्या या छोट्या छोट्या कृत्यांमुळेच तू अनेकांची आवडती आहेस”, “श्रेया तुझ्यासारखी तूच” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी श्रेयाच्या कृतीला दाद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्रेया ही संगीत क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहे. श्रेयाला चार राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. श्रेयानं आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. श्रेया फक्त हिंदीतच नाही, तर अनेक भाषांमध्ये गाणी गाते. संगीत क्षेत्रातील श्रेयाचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिचे जगभरात लाखो चाहते आहेत.