Bollywood’s first female superstar: काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये येतात आणि त्यांचा वारसा मागे सोडतात. दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला त्यापैकीच एक आहेत. भरतनाट्यम डान्सर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी करिअरची सुरुवात तमीळ चित्रपटांतून केली. त्यानंतर त्या हिंदी सिनेमाकडे वळल्या.

‘या’ होत्या वैजयंतीमाला यांच्या समकालीन अभिनेत्री

चेन्नईतील एका सनातनी तमीळ ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात वैजयंतीमाला यांचा जन्म झाला होता. तरीही त्यांच्या दमदार भूमिका आणि त्या भूमिका साकारण्याचे त्यांचे कौशल्य यांमुळे चित्रपटसृष्टीत त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. ५० व ६० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवले. मीना कुमारी, मधुबाला, नर्गिस, सुचित्रा सेन, वहिदा रहमान या दिग्गज अभिनेत्री त्या काळात काम करत होत्या. त्यांना टक्कर देत, त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले.

वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटांत पदार्पण

वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पदार्पण केले. १९४९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाझकाई’ या तमीळ चित्रपटात त्या पहिल्यांदा दिसल्या होत्या. अभिनयाच्या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. एकदा ‘नागिन’चे दिग्दर्शक नंदलाल जसवंतलाल यांनी त्यांना ‘इडली’ म्हटले होते, त्यामुळे त्या रडल्या होत्या. तुझा चेहरा इडलीसारखा गोल आहे. इडलीसारखी दिसू नकोस, असे संपूर्ण टीमसमोर म्हटल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. वैजयंतीमाला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.

‘देवदास’ चित्रपटानंतर करिअरमध्ये नवीन वळण

गंगा जमुना, आम्रपाली व संगम या चित्रपटांमधील त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असे. मात्र, तरीही अनेकदा त्यांना त्यांच्या नृत्यासाठी ओळखले जात असे. मात्र, देवदासमधील त्यांच्या भूमिकेने सर्वांची धारणा बदलली. वैजंयतीमाला यांनी याबद्दल लिहिले, ” ‘देवदास’ प्रदर्शित होईपर्यंत, समीक्षक माझ्याकडे एक डान्सर म्हणून बघत असत. पण, ‘देवदास’मधील माझी भूमिका पाहिल्यानंतर त्यांची माझ्याबद्दलची धारणा बदलली. ‘देवदास’मुळे माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. समीक्षकांच्या कौतुकामुळे चांगल्या ऑफर्स मिळाल्या. मी माझी प्रतिष्ठा मिळवली. मुख्य प्रवाहात मला स्वीकारले गेले.”

दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या व्यावसायिक नात्यात दुरावा

‘देवदास’नंतर, वैजयंतीमाला यांनी दिलीप कुमार यांच्याबरोबर ‘नया दौर, ‘मधुमती’, ‘पैघम’, ‘गंगा जमुना’ ‘लीडर’ व ‘संघर्ष’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे ते नात्यात आहेत, अशा अफवा पसरल्या; परंतु दोघांनीही ते नात्यात नसल्याचे सांगितले. मात्र, एक काळ असाही आला की, दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या व्यावसायिक नात्यात दुरावा आला होता. ‘राम और श्याम’ चित्रपटात वहिदा रेहमान यांनी वैजयंतीमाला यांची जागा घेतली. हे घडले कारण दिलीप कुमार यांचा ‘लीडर’ आणि राज कपूर यांचा ‘संगम’ हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखा एकाच वेळी होत्या. त्या दोघांमध्ये स्पर्धा होती.

राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या नात्याची चर्चा

राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र, वैजयंतीमाला यांनी त्यांच्या पुस्तकात या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रेमसंबंध असल्याच्या अफवा कपूर यांनी निर्माण केल्या, असा आरोपही त्यांनी केला.

मात्र, ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात वडील राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या प्रेमामुळे ते त्यांच्या आईसह घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेले होते, असे लिहिले. त्यांनी लिहिले, “मला आठवतंय की जेव्हा बाबा वैजयंतीमालांसोबत प्रेमात होते तेव्हा मी माझ्या आईसोबत मरीन ड्राइव्हवरील नटराज हॉटेलमध्ये राहायला गेलो होतो. हॉटेलमधून आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकूटमधील एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेलो होतो.”

१९६८ मध्ये वैजयंतीमाला यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना कपूर यांचे फॅमिली डॉक्टर डॉ. चमनलाल बाली यांच्याशी लग्न केले. त्यांमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपट सोडले. नृत्याची आवड कायम ठेवण्यासाठी त्यांनी लाइव्ह शोमध्ये काम करणे सुरू ठेवले. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे, “मी माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगला निर्णय घेतला. मी योग्य वेळी चित्रपट सोडले. मला त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. कारण मी काही सर्वोत्तम कलाकारांसोबत काम केले आहे.”