Bollywood’s Most Famous comedian: भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात त्यांचे नाव कायमचे कोरले आहे. त्यांच्या अभिनयाबद्दल आजही बोलले जाते. या कलाकारांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे.
जॉनी वॉकर हे अशा कलाकारांपैकीच एक अभिनेते आहेत. ज्यांच्या अभिनयाची, भूमिकांची आजही चर्चा होताना दिसते. ज्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रेमळ दारूड्याच्या भूमिका विशेष गाजल्या.
मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ज्या अभिनेत्याच्या भूमिका पाहून प्रेक्षकांना विश्वास बसला की या व्यक्तीजवळ कायम दारूची बॉटल असेल, त्या व्यक्तीने कधीही दारूला त्याच्या आयुष्यात हात लावलेला नाही. विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यामागे एक शिस्तप्रिय, प्रेमळ व्यक्ती होती.
‘या’ चित्रपटातून केलेले पदार्पण
जॉनी वॉकर यांचे खरे नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी असे होते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० ला इंदूर येथे झाला. त्यांची परिस्थिती गरीब होती. त्यांचे वडील एका गिरणीत काम करत होते. गिरणी बंद पडल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले. तिथे त्यांनी उदरनिर्वाहासाठी बस कंडक्टर म्हणून काम केले. हे काम करत असतानाच त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.
प्रवासी त्याच्या विनोदांवर आणि नक्कल करण्यावर हसत असत. एके दिवशी त्या बसमध्ये अभिनेते बलराज साहनी प्रवास करत होते. त्यांनी बद्रुद्दीन यांना पाहिले. त्यांनी त्यांची ओळख गुरु दत्त यांच्याशी करून दिली. गुरू दत्त यांनी त्यांना १९५१ ला प्रदर्शित झालेल्या बाजी चित्रपटात मद्यपिची भूमिका दिली. त्यांच्या अभिनयाने प्रभावीत झालेल्या गुरू दत्त यांनी त्यांचे नाव जॉनी वॉकर असे ठेवले. हे नाव प्रसिद्ध व्हिस्की ब्रँडच्या नावावरून ठेवले होते. याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली.
तेव्हापासून जॉनी वॉकर यांनी मागे वळून पाहिले नाही. जॉनी वॉकर यांच्या प्रत्येक भूमिकेत विनोदही पाहायला मिळायचा आणि माणुसकीदेखील दिसायची. ‘मधुमती’, ‘नया दौर’, ‘चोरी चोरी’, ‘प्यासा’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘सीआयडी’ आणि ‘कागज के फूल’ अशा चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांनी १९९८ ला प्रदर्शित झालेल्या ‘चाची ४२०’ या चित्रपटातही काम केले.
दरम्यान, २९ जुलै २००३ ला जॉनी वॉकर यांचे निधन झाले.
