Boney Kapoor spent Rs 210 crore on Maidaan Movie: बोनी कपूर चित्रपट निर्माते म्हणून लोकप्रिय आहेत. अनेकदा ते दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी व मुली जान्हवी व खुशी कपूर यांच्यामुळेदेखील चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला मैदान हा चित्रपट बोनी कपूर यांच्या निर्मितीतला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. चित्रपट पूर्ण होण्यास जवळजवळ पाच वर्षांचा कालावधी लागला. सुरुवातीला या चित्रपटाचे बजेट १२० कोटी इतके होते. मात्र, शूटिंग पूर्ण होईपर्यंत याचे बजेट २१० कोटींइतके झाले.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे निर्माते बोनी कपूर यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांच्यावर कर्ज झाले आणि ते फेडण्यासाठी त्यांनी पैसे उधार घेतले होते.
“चार वर्षांहून अधिक काळ…”
बोनी कपूर यांनी नुकतीच कोमल नहाटा यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. ते म्हणाल, “‘मैदान’ या चित्रपटाच्या वेळी मला खूप तोटा सहन करावा लागला. कोविड-१९ मुळे हा चित्रपट चार वर्षांहून अधिक काळ अडकून पडला होता. त्याचे कारण असे की, चित्रपटाचे सुमारे ७०% काम जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण झाले होते. आम्हाला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सामने शूट करायचे होते. सर्व आंतरराष्ट्रीय संघ आले होते. परदेशातील सुमारे २०० ते २५० लोकांचा क्रू होता. ते वेगवेगळ्या देशांचे खेळाडू होते.”
“पण मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सर्व शूटिंग थांबवण्यात आले, विमान प्रवास रद्द करण्यात आला. कोणालाही माहीत नव्हते की, लॉकडाऊन इतके महिने वाढेल. देशातील शेवटची फ्लाइट जाहीर होईपर्यंत मी युनिट तिथेच ठेवले होते. माझ्याबरोबर हे चार वेळा घडले. कोविडबरोबरच त्या काळात आलेल्या चक्रीवादळामुळे मलाही तोटा सहन करावा लागला. माझा संपूर्ण स्टेडियमचा सेट उद्ध्वस्त झाला. आम्ही ठरवलेले बजेट १२० कोटी रुपये होते; परंतु आम्हाला सुमारे २१० कोटी रुपये खर्च करावे लागले.”
पुढे बोनी कपूर म्हणाले, “जेव्हा आम्ही सामन्यांचे शूटिंग करीत होतो. तेव्हा आमच्याकडे ८०० लोकांचे युनिट असायचे. त्यावेळी कोविडमुळे निर्बंध होते. त्यामुळे त्या काळात मी संपूर्ण युनिटसाठी ‘ताज’मधून जेवण मागवले. सेटवर मला चार रुग्णवाहिका आणि डॉक्टर सेटवर ठेवावे लागत असत. निर्बंधांमुळे आम्हाला सेटवर १५० पेक्षा जास्त लोकांना ठेवण्याची परवानगी नव्हती. आम्हाला एकत्र जेवण्याचीही परवानगी नव्हती.”
“आम्ही एका ब्रँडशी करार केला होता. त्यांनी पाणी पुरवले; पण त्यांचे बिल खूप जास्त होते. सेटवरील सर्वांना डिस्टिल्ड वॉटर द्यावे लागले. जेणेकरून त्यांना ते सुरक्षित आहेत, असे वाटेल. त्या पाण्याचे बिल एका छोट्या चित्रपटाच्या बजेटइतके होते.”
“फुटबॉल सीक्वेन्सच्या शूटिंगवेळी गर्दी दाखवण्यासाठी बँकॉकला जावे लागले, त्यामुळे जास्त पैसे मोजावे लागले. जेव्हा हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तो अपयशी ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ६८ कोटी रुपये कमावले.”
ड्रिस्टिब्युटर्स किंवा जे विक्रेते होते, त्यांना पैसे देण्यासाठी उधारी घ्यावी लागली. त्याबद्दल बोनी कपूर म्हणाले, ” ‘मैदान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर मला माझ्या विक्रेत्यांना पैसे देण्यासाठी उधार घ्यावे लागले. चित्रपट अयशस्वी ठरला; पण तो त्यांचा दोष नव्हता. खरं तर, त्यांनी चार वर्षे वाट पाहिली आणि काहींनी तर त्यांचे १०-१५% पैसेही कमी केले.”
बोनी कपूर असेही म्हणाले, “चित्रपट फ्लॉप ठरला. त्याचा दोष कोणा एका व्यक्तीचा नाही. ते माझे नशीब होते.” बोनी कपूर यांना याआधीही मोठे नुकसान सहन करावे लागले होते.