‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सोनचिडीया’, ‘द स्काय इज पिंक’, ‘रश्मी रॉकेट’ सारख्या राष्ट्रीय आणि मानवी हिताच्या कथा पडद्यावर आणल्यानंतर, RSVP मुव्हीज ही निर्मिती संस्था आणखी एक वास्तविक चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येत आहे. रॉनी स्क्रूवाला, अभिषेक चौबे आणि हनी त्रेहान हे तिघे मिळून मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्यावरील चरित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रेहान यांनी केले असून यात अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अद्याप या चित्रपटाचं नावही ठरलेलं नसताना अशातच यांच्या निर्मात्यांसमोर एक वेगळंच संकट उभं ठाकलं आहे. चित्रपटसृष्टीतील खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार निर्माते गेल्या ६ महिन्यांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉरच्या मंजुरीची वाट बघत आहेत. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी अर्ज केला होता आणि तो पुनरावलोकन समितीकडे पाठवण्यात आला होता. टीमने विनंती केलेले सर्व आवश्यक कागदपत्रंही त्यात जोडलेली होती. CBFC कडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्मात्यांनी अखेर बुधवारी (१४ जून) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आणखी वाचा : ‘बॉम्बे’चित्रपटावर काम करणाऱ्या रेहमान यांना काढून टाकणार होते मणी रत्नम; नेमकं काय घडलं होतं?

जसवंत सिंग खालरा हे पंजाबच्या एका बँकेचे डायरेक्टर होते. पंजाबवर जेव्हा आतंकवादाचं सावट होतं त्या कालावधीत पोलिसांकडून केल्या गेलेल्या हजारो अनोळखी मृतदेहांचे अपहरण, निर्मूलन आणि अंत्यसंस्काराचे पुरावे जसवंत यांच्या हाती लागले होते. जसवंतसिंग खालरा यांच्या चौकशीमुळे या गोष्टीचा जगभरातून निषेध होऊ लागला. सीबीआयने त्यांच्या निष्कर्षात नमूद केले की की पंजाब पोलिसांनी एकट्या तरनतारण जिल्ह्यात २०९७ लोकांवर बेकायदेशीररित्या अंत्यसंस्कार केले. ६ सप्टेंबर १९९५ रोजी जसवंत सिंग अचानक गायब झाले, त्यांच्या कुटुंबीयांनी याची रीतसर पोलिसांत तक्रार केली.

पंजाबच्या ६ पोलिस अधिकाऱ्यांना नंतर जसवंत सिंग खालरा यांचं अपहरण आणि खून केल्याच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली. आता चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा या प्रकरणाची चर्चा कोर्टापर्यंत होणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉरकडून पास का केलं जात नाहीये याबद्दल अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने भाष्य केलेलं नाही. ४ जुलैला या प्रकरणावर कोर्टात सुनावणी होणार आहे.