माजी मिस इंडिया आणि बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचा दिवंगत मुलगा शमशेरसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सेलिनाचा मुलगा हयात असता तर तो आता ८ वर्षांचा असता. शमशेर तिच्या जुळ्या मुलांपैकी एक होता. सेलिनाने मुलाला श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे.

४३ वर्षांच्या सेलिना जेटलीने या पोस्टमध्ये तिच्या दिवंगत बाळाबद्दल सांगितलं आहे. गरोदर असतानाही मुलाला वाचवण्यासाठी ती किती काळजी घेत होती त्याबद्दल तिने माहिती दिली. मुलाला दुर्मिळ आजार होता आणि त्याच्या उपचारासाठी भारतासह युकेमध्येही गेली होती.

“मी त्याला वाचवू शकले असते तर… पण मी वाचवू शकले नाही. या फोटोमध्ये मी अर्थूबरोबर त्याच्या जुळ्या भावाच्या शमशेरच्या थडग्याजवळ आहे. माझा चौथा मुलगा आर्थरचा १० सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. पण त्याच्याबरोबर त्याचा जुळा भाऊ समशेर आता असता तर परिस्थिती कशी वेगळी असती हा विचार मनाला शिवून जातो,” असं सेलिनाने लिहिलं.

सेलिना ६ महिन्यांची गरोदर असताना तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. या धक्क्यातून सेलिना सावरली नव्हतीच तर समशेरला हायपोप्लास्टिक (हृदयविकार) असल्याचं समजलं होतं. “हे तेच डॉक्टर होते ज्यांनी दुबईमध्ये विन्स्टन विराजचे गर्भ स्कॅन केले होते. आर्थर आणि शमशेरच्या स्कॅन दरम्यान, डॉक्टर अचानक २० मिनिटं शांत बसले, नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला एका व्यक्तीबरोबर यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं हसू उडालं होतं. आम्हाला त्यांनी सागितलं की जुळ्यांपैकी एकाला हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम (HLHS) आहे, ही एक दुर्मिळ जन्मजात हृदयाशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये हृदयाचा डावा भाग योग्यरित्या विकसित होत नाही,” असं सेलिनाने सांगितलं.

पाहा पोस्ट-

गरोदर असतानाच हे सगळं समजल्यावर मुलाला वाचवण्यासाठी सेलिनाने खूप प्रयत्न केले. ते दुबईतील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडे केले होते, त्यांनी लंडनला पाठवलं, युकेला पाठवलं, नंतर भारतातही डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फायदा झाला नाही. तो गर्भात असताना त्याच्यावर उपचार करता येतील अशी औषधं असती तर तीही घेतली असती, शस्त्रक्रिया होऊ शकली असती तर केली असती, पण काहीच झालं नाही, त्याची जिवंत राहण्याची शक्यताच खूप कमी होती, असं सेलिनाने नमूद केलं.

“गरोदर राहण्यासाठी दोन वर्षे तयारी केली होती, शरीर डिटॉक्स केले होते ज्यामुळे गरोदरपणात अडचणी येणार नाहीत. नंतर देवाने मला जुळ्या मुलांच्या रुपात आशीर्वाद दिले, पण शेवट आनंदी झाला नाही. असं काही घडलं ज्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता,” असं सेलिना म्हणाली.

सेलिना जेटलीने २००३ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘नो एंट्री’, ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘टॉम, डिक अँड हॅरी’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकली. २०११ मध्ये तिने ऑस्ट्रियन हॉटेल व्यावसायिक पीटर हागशी लग्न केलं. २०१२ मध्ये तिला जुळी मुलं झाली. नंतर २०१७ मध्ये पुन्हा तिला जुळी मुलं झाली. त्यापैकी समशेरचं निधन झालं होतं.