Chhaava Fame Actor Welcome Baby Boy : यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चाललेला सिनेमा म्हणजे ‘छावा’. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमातील एका अभिनेत्याने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे अभिनेता बाबा झाला आहे. त्याच्या घरी एका चिमूकल्याचं आगमन झालं आहे. याबद्दल स्वत: अभिनेत्यानेच सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
‘छावा’ या चित्रपटात कवी कलश यांची लक्षवेधी भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंह बाबा झाला आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्याच्या घरात ही आनंदाची बातमी आली आहे. विनीत आणि त्याची पत्नी रुचिरा यांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
२०२५ हे वर्ष विनीतसाठी खूप खास ठरलं आहे. एकीकडे त्याचं ‘छावा’, ‘जाट’ आणि ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’सारख्या चित्रपटांतील अभिनयाचे कौतुक झालं, तर दुसरीकडे अभिनेता बाबा झाला आहे, त्यामुळे आता त्याच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.
विनीतने सोशल मीडियावर ‘It’s Boy’ अशी पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसह त्याने कॅप्शनमध्ये “आमच्यावर देवाची कृपा झाली आहे. आमचा छोटं सिंह या जगात आला आहे आणि त्याने आमचं हृदय जिंकलं आहे. यासाठी देवाचे मनःपूर्वक आभार” अशा आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.
विनीत कुमार बाबा होताच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. विनीतने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेक कलाकारांनी विनीतला शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांसह चाहत्यांनीसुद्धा त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आई होताच रुचिराने (विनीत कुमारची पत्नी) ‘हिंदुस्तान टाईम्स’शी साधलेल्या संवादात “मी खूप आनंदी आहे. सध्या आयुष्यात खूप काही घडत आहे आणि यामुळे मला माझ्या भावना रोखता येत नाहीयेत” असं म्हटलं.
विनीत कुमार सिंह इन्स्टाग्राम पोस्ट
विनीत आणि रुचिरा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, विनीत आणि पत्नी रुचिरा यांनी २०२१ मध्ये एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नापूर्वी त्यांनी जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. अशातच लग्नाच्या तीन वर्षांनी दोघांनी आई-बाबा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे.
दरम्यान, विनीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, यावर्षी त्याने मोजक्या चित्रपटांतूनही प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘छावा’मधील त्याच्या अभिनयाचं प्रचंड खूप कौतुक झालं. त्यानंतर विनीतने सनी देओलबरोबरच्या ‘जाट’मध्ये विनीतने खलनायकाची भूमिका साकारली. तर ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’मधील अभिनयानेही त्याने लक्ष वेधून घेतलं. अशातच नुकतीच त्याची ‘रंगीन’ ही वेबसीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.