Vicky Kaushal Reaction On Santosh Juvekar Trolling : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात अभिनेता संतोष जुवेकरने राजाजी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषनं काही मुलाखतींमधून सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाशी न बोलल्याचं वक्तव्य केलं होतं.

त्यामुळे संतोषला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. या ट्रोलिंगवर काही मराठी कलाकारांनी संतोषला पाठिंबा देत ट्रोलर्सचे कान टोचले होते. अशातच या ट्रोलिंगवर विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकरांची काय प्रतिक्रिया होती? त्याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत संतोषनं माहिती दिली आहे.

Zen Entertainment ला दिलेल्या मुलाखतीत संतोष म्हणाला, “आपली विचार करण्याची पद्धत जशी आहे किंवा मी ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघतो, विचार करतो, तसे आपल्या घरचे करतीलच, असं नाही. ट्रोलिंगनंतर माझी आई बोलली की, ‘हे काय होतंय? त्यांना तुझ्याबद्दल माहीत नाही का?’ तेव्हा मी आई-वडिलांना म्हटलं होतं की, ‘तुम्ही याकडे लक्ष देऊ नका. मी याचा विचार करीत नाही. तुम्हीसुद्धा करू नका.’ कारण- मला त्याचा काही फरक पडत नाही.”

त्यानंतर संतोष म्हणाला, “ट्रोलिंगमुळे मला फरक पडला नाही; पण आपल्या घरच्यांना फरक पडतो. मला माहीत नाही, ट्रोल करणारी ही माणसं कोण आहेत? ती माणसं तरी आहेत का? पण हे जर कधी त्यांच्याबरोबर झालं आणि या सगळ्याचा त्रास त्यांच्या घरच्यांना होईल, तेव्हा परिस्थिती कशी असेल याचा विचार करावा.”

त्यानंतर संतोष म्हणतो, “‘छावा’मुळे माझे घरचे कुटुंबीय, मित्र आणि मी स्वत:सुद्धा खूप आनंदात होतो. दोन मिनिटं किंवा दोन सीनची भूमिका माझ्या वाटेला आली असली तरी तो सिनेमा माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्या सिनेमात मला काम करायला मिळालं हे माझं भाग्य. पण तेव्हा मी त्या आनंदाचा उपभोग घेत असतानाच माझ्या आनंदावर कोणीतरी विरजण टाकलं. अर्थात, तेव्हा मला त्या सगळ्या ट्रोलिंगचा त्रास झाला; पण माझ्या घरच्यांना कळलं की, या गोष्टी मी मनाला लावून घेतल्या नाहीत.”

संतोष जुवेकर इन्स्टाग्राम पोस्ट

नंतर संतोष म्हणाला, “घरच्यांचं तरी ठीक आहे; पण लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशलसुद्धा माझ्याशी याबद्दल बोलले. ‘छावा’ सिनेमाची सक्सेस पार्टी झाली. तेव्हा मी लक्ष्मणसर आणि विकीला भेटलो. तेव्हा विकी मला हसत हसत ‘तू तर माझ्यापेक्षाही प्रसिद्ध झालास’ असं म्हणालेला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे संतोषने सांगितलं, “त्या पार्टीत लक्ष्मणसर आणि विकी मला म्हणाले, ‘संत्या सोड हा विषय. याबद्दल जास्त विचार करू नकोस. तू एक माणूस म्हणून कसा आहेस? हे तुझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे तू त्यांचा विचार कर. जे ट्रोल करत आहेत, त्यांचा विचार करू नको. त्या ट्रोलिंगवर तू उत्तरही देऊ नको. कारण- जर तू उत्तर दिलंस; तर ते आणखीन बोलणार. ते तुझ्या उत्तराचीच वाट बघत बसणार. त्यामुळे तू कोणाला उत्तरं देऊ नकोस.”