Chhaya Kadam wears a Himachal Pradesh Pattu Saree: लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम नुकत्याच ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळचे त्यांचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करीत त्यांनी या फिल्म फेस्टिव्हलमधील झलक दाखवली.

या चित्रपट महोत्सवाला गेल्यानंतर छाया कदम यांनी हिमाचलमधील पट्टू साडी नेसली. आता त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत ही साडी दाखवली. तसेच, त्यांच्या भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या.

छाया कदम काय म्हणाल्या?

छाया कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांना हिमाचल प्रदेशच्या संस्कृतीची ओळख असणारी पट्टू साडी नेसवली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले, “जशी माती : तशा रीती. ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निम्मिताने देवभूमी मानल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशसारख्या सुंदर राज्याला भेट देता आली.”

पुढे त्यांनी लिहिले, “देवभूमी असलेल्या हिमाचल प्रदेश, शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्तम लेखिका असलेल्या देवकन्याबरोबर भेट झाली. देवकन्येने अगदी प्रेमाने हिमाचल प्रदेशची सांस्कृतिक ओळख असणारी पट्टू साडी मला नेसवली.”

“इतक्या सुंदर देवभूमीतली माणसे जितकी आपलीशी वाटणारी होती. अगदी तशीच मला ही पट्टू साडी नेसल्यावर एका वेगळ्या आपलेपणाची ऊब मिळाली.”

देवकन्या यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत छाया कदम यांनी लिहिले की, पट्टू साडीचा हा सुंदर उबदार अनुभव देण्यासाठी देवकन्या यांना खूप खूप धन्यवाद.” ही साडी नेसून, त्या मारुतीची मूर्ती पाहायला गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

याआधी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमलामधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या.

त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांच्या लाल या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग झाले. त्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील त्यांचा आजपर्यंतच्या कामासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.