काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. यानंतर दहशतवाद्यांविरुद्ध देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला. देशातील सामान्य नागरिकांसह, अनेक कलाकारांनीही सोशल मीडियामार्फत त्यांचा राग व्यक्त केला. तर यावेळी काही कलाकारांनी सरकारकडे पहलगाम येथे पर्यटकांचा जीव घेणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अशातच दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडानेही एका कार्यक्रमादरम्यान यावर त्याचं मत मांडत दहशतवाद्यांविरुद्ध संताप व्यक्त केला होता. परंतु, यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. विजय ‘रेट्रो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमाला गेला असताना तिथे त्याने याबाबत भाष्य केलं होतं.

यावेळी त्याने, “काश्मीरमध्ये जे झालं त्यावर उपाय म्हणजे लोकांना सुक्षिशित करणं, जेणेकरून ते दुसऱ्या कोणाच्याही वाईट विचारांनी प्रभावीत होणार नाहीत, त्यांना हे करून काहीच मिळणार नाही. काश्मीर भारताचाच भाग आहे आणि काश्मिरीही आपले आहेत,” असं म्हटलं आहे.

पुढे याबाबत बोलताना तो म्हणाला, “भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याची काही गरज नाही, कारण पाकिस्तानी स्वत:च तेथील सरकारला वैतागले आहेत आणि जर त्यांची परिस्थिती सुधारली नाही तर तेच त्यांच्यावर एक दिवस हल्ला करतील. ५०० वर्षांपूर्वी आदिवासी वागायचे तसे ते वागत आहेत, काहीही अर्थ नसताना भांडत आहेत.”

यानंतर आता पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना आदिवासी समाजाचा उल्लेख करून बोलल्याने विजय देवरकोंडावर तेथील किशनराज चौहान या वकिलांनी “त्याने आदिवासी समाजाचा अपमान केला आहे” म्हणत तक्रार नोंदवली आहे. यासह त्यांनी “हा केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नाही तर तो दुर्लक्षित समुदायांचा अनादर आणि संरक्षणाच्याही आदराचा प्रश्न आहे. आम्ही अनुसूचित जाती/जमाती अत्याचार कायद्यांतर्गत अभिनेत्याविरोधात त्वरीत कायदेशीर कारवाईची मागणी करतो,” असंही म्हटलं आहे.

हैदराबाद येथील संजीव रेड्डी या पोलिस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर क्रिशनराज यांनी विजयने लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी केली आहे. अद्याप स्वत:वर झालेल्या आरोपानंतर अभिनेत्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, अभिनेता विजय देवरकोंडा हा साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. विजय आता साऊथसह बॉलीवूडमधील चित्रपटांमध्येही काम करत आहे, तर त्याने २०२२ साली आलेल्या ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकताच तो २०२४ ला प्रदर्शित झालेल्या ‘द फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासह मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत दिसली होती.