Deepika Padukone Daughter Dua’s First Birthday Celebration : बॉलीवूडचं स्टार कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर-दीपिकाला गेल्यावर्षी ८ सप्टेंबरला गोंडस मुलगी झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका पादुकोणने घरात लक्ष्मी आल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. यानंतर रणवीर सिंह आणि दीपिकाने गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या लेकीचं ‘दुआ’ हे नाव ठेवल्याचं जाहीर केलं होतं.

याशिवाय लेकीचं नाव जाहीर केल्यावर दीपिकाने ‘दुआ पादुकोण सिंह…दुआ म्हणजे प्रार्थना’ असा तिच्या नावाचा अर्थ देखील सर्वांना सांगितला होता. दुआच्या जन्मानंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीमधून काही महिने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. आता दीपिका हळुहळू पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करू लागली आहे. मात्र, या सगळ्यात लेकीला वेळ देण्यास अजिबात विसरणार नाही…आत ती आमचं पहिलं प्राधान्य असेल असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

यानुसार दीपिकाने वेळात वेळ काढून लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्रीने लेकीच्या बर्थडेसाठी खास चॉकलेट केक बनवला होता. या केकचा फोटो दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. टेबलवर मधोमध केक आणि आजूबाजूला फुलांची सजावट केल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

“माझ्यासाठी प्रेमाची भाषा कोणती आहे माहितीये का? मी माझ्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास केक बनवला होता” असं कॅप्शन दीपिकाने या पोस्टला दिलं आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी लवकरात लवकर दुआचा चेहरा दाखव अशी मागणी दीपिकाकडे केली आहे. मात्र, दीपिका प्रायव्हसीचा विचार करता सध्या तरी दुआला सोशल मीडियावर रिव्हिल करणार नाहीये. कारण, मध्यंतरी दुआचे एअरपोर्टवर गुपचूप फोटो काढणाऱ्यांना देखील अभिनेत्रीने फटकारलं होतं.

दरम्यान, गेल्यावर्षी ( २०२४ ) गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबरला दीपिकाने दुआला जन्म दिला होता. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून रणवीर व दीपिकाची लव्हस्टोरी सुरू झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर व दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. यानंतर २०२४ मध्ये रणवीर-दीपिका आई-बाबा झाले.