Priyanka Chopra Talks About Her Comback In Indian Film : प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये नाव कमावल्यानंतर तिने हॉलीवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु, गेला बराच काळ अभिनेत्रीने भारतीय सिनेमात काम केलं नव्हतं. अशातच आता देसी गर्ल लवकरच भारतीय सिनेमात पुनरागमन करणार आहे.

प्रियांका चोप्रा लवकरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक राजामौलींच्या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. गेले कित्येक दिवस तिच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात तिच्यासह दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू देखील झळकणार आहेत. महेश बाबू व प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

राजामौली दिग्दर्शित GlobeTrotter मध्ये प्रियांका चोप्रा व महेश बाबू महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अशातच काल १२ नोव्हेंबर रोजी या चित्रपटातील प्रियांका चोप्राचा लूक रिव्हिल करण्यात आला. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला. GlobeTrotter या चित्रपटातील प्रियांकाच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये प्रियांका चोप्राच्या भूमिकेचं नाव मंदाकिनी (Mandakini) असं आहे.

‘असा’ आहे प्रियांका चोप्राचा लूक

प्रियांका यामध्ये पिवळ्या रंगाच्या प्लेन साडीत पाहायला मिळते, तर तिच्या हातात बंदूक असल्याचं दिसतं. यासह प्रियांकाच्या पायातही पारंपरिक कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळतेय. त्यामुळे एकूणच अभिनेत्रीचा या चित्रपटातील लूक उत्सुकता वाढवत आहे. प्रियांका चोप्राच्या या लूकमुळे चित्रपटात तिची भूमिका नेमकी कशी आहे आणि एकंदरीतच तिची व महेश बाबूची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

प्रियांकाने यासह GlobeTrotter या चित्रपटासंबंधित एक्सवर ट्विटही केलं होतं. तिने यावेळी म्हटलं की, “आशा करते की हा एक नवीन एरा असेल. मी भारतीय सिनेमात पुनरागम करत आहे. मला खात्री नाहीये, पण मला माहीत आहे की हे सगळं खूप अप्रतिम असणार आहे.”

अद्याप या चित्रपटाची रीलिज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. पण, या चित्रपटाचा टीझर येत्या १५ नोव्हेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे राजमौली, महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा या तीन व्यक्ती एकत्र काम करत असल्याने या चित्रपटाची चर्चा होत असून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचं दिसतं.