Amitabh Bachchan Sholay Movie : ‘शोले’ हा बॉलीवूडमधील एक काळ गाजवलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. आजही अनेकदा प्रेक्षक आवडीने हा चित्रपट बघतात. पण ९०च्या काळातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट कायमच खास राहिल. १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. जय आणि विरू म्हणजेच अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांची या चित्रपटातील मित्रांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या दोघांमधील मैत्री त्यांना विशेष भावली. आजही दोन घट्ट मित्र असले की त्यांना जय आणि विरू या नावाने संबोधलं जातं. या व्यतिरिक्त या चित्रपटातील ठाकूर बलदेव सिंह आणि गब्बर सिंह या भूमिकांनीसुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं

‘शोले’ चित्रपट हा हिंदीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. यामधील कलाकारांनी साकारलेली पात्र आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या कामासाठी किती मानधन मिळालं होतं? ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार या चित्रपटात विरूची भूमिका साकारणारे अभिनेते धर्मेंद्र यांना १ लाख ५ हजार इतकं मानधन मिळालं होतं. ठाकूर बलदेव सिंहची भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कुमार यांना सर्वाधिक १ लाख २५ हजार इतकी रक्कम मिळाली होती. तर अमिताभ बच्चन यांना या दोघांपेक्षा कमी १ लाख इतकी रक्कम मिळाली होती.

‘शोले’ चित्रपटात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी महत्तवपूर्ण भूमिका साकारली होती. त्यावेळी या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ७५ हजार इतकी रक्कम मिळाली होती. यामध्ये गब्बर सिंहची भूमिका साकारणारे अमजद खानला ५० हजार रुपये मिळाले होत. तर अभिनेत्री जया बच्चन यांना सर्वात कमी ३५ हजार इतकं मानधन मिळालं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शोले’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली जयची भूमिका अभिनेते शत्रुघ्न सिन्हा साकारणार होते. परंतु, धर्मेंद्र यांनी रमेश सिप्पी यांना अमिताभ यांचं नाव सुचवलं. याबाबत धर्मेंद्र यांनी ‘आपकी अदालत’ मध्ये सांगितलं होतं. येत्या १५ ऑगस्टला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० वर्षे पूर्ण होतील.