Dharmendra’s First Wife Talked About Hema Malini : धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्या काळी अनेक चित्रपटांतून काम केलं होतं. त्यादरम्यानच त्यांची भेट झाली अभिनेत्री हेमा मालिनींबरोबर. त्यावेळी ते विवाहित होते. परंतु, धर्मेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात पडले आणि त्या काळी त्या दोघांची प्रेमकहाणी खूप गाजलेली.

पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झालेलं असतानाही धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांच्या पहिल्या पत्नीनं एका मुलाखतीत पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलेलं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार त्यावेळी पहिल्या पत्नीबरोबर विवाहित असतानाही हेमा मालिनींबरोबर लग्न करण्यासाठी त्यांनी धर्म बदलल्याचं अनेकांनी म्हटलं. परंतु, प्रकाश कौर कायम प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली होती. १९८१ मध्ये त्यांनी ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं, “फक्त माझाच नवरा का? कोणत्याही पुरुषानं माझ्या व हेमामध्ये तिचीच निवड केली असती.” पुढे त्या प्रश्न उपस्थित करीत म्हणाल्या, “कोणाची हिंमत झाली त्यांच्याबद्दल असं काही बोलण्याची. इंडस्ट्रीत अर्ध्याहून अधिक लोक तेच करीत आहेत.”

इंडस्ट्रीतील नायकांबद्दल धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी काय म्हणालेल्या?

त्याच मुलाखतीत पुढे त्या म्हणालेल्या, “सर्व नायकांचे विवाहबाह्य संबंध असून, सगळेच दुसरं लग्न करीत आहेत. ते कदाचित चांगले पती नसतील; पण ते माझ्याशी खूप चांगलं वागतात आणि ते उत्कृष्ट वडील आहेत. मुलांवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्यांच्याकडे ते कधीच दुर्लक्ष करीत नाहीत.”

प्रकाश कौर हेमा मालिनी यांच्याबद्दल म्हणालेल्या, “हेमा कोणत्या प्रसंगातून गेली असेल, ते मी समजू शकते. तिलासुद्धा सगळ्यांना सामोरं जावं लागत असेल, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांना तोंड द्यावं लागत असेल. पण, जर मी हेमाच्या जागी असते तर तिनं जे केलं, ते मी कधीच केलं नसतं. स्त्री म्हणून तिच्या भावना मी समजू शकते. पण एक पत्नी आणि आई म्हणून मी यासाठी त्यांना कधीच परवानगी दिली नसती.”

धर्मेंद्र यांनी जरी दुसरं लग्न केलं असलं तरी प्रकाश कौर यांच्या आयुष्यात मात्र धर्मेंद्र हे एकमेव पुरुष होते. त्यांनी कायम त्यांच्या पतीचा आदर केला. त्यांनी जे घडलं, ते घडलं, असं म्हणत धर्मेंद्र किंवा स्वत:च्या नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचं म्हटलं होतं. त्यांनी असंही सांगितलेलं की, त्यांना गरज असायची तेव्हा धर्मेंद्र कायम त्यांच्या मदतीसाठी यायचे.

धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी वयाच्या १९व्या वर्षी १९५४मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्यानं दोन मुली व दोन मुलं सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल, अजीता देओल अशा चार मुलांना जन्म दिला. त्यानंतर धर्मेंद्र यांनी १९८०मध्ये हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं आणि त्या दोघांनी ईशा देओल व आहाना देओल अशा दोन मुलींना जन्म दिला.