Dharmendra Health Updates : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृती संदर्भातील अनेक अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळेच, मंगळवारी ( ११ नोव्हेंबर ) सकाळी त्यांची मुलगी ईशा देओलने पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची अपडेट सर्वांबरोबर शेअर केली. तसेच कोणीही खोट्या बातम्या पसरवू नका, आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा अशी विनंती ईशाने तिच्या पोस्टद्वारे केली आहे.
याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील एक्स पोस्ट शेअर करत धमेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. हेमा मालिनी व ईशा देओल या दोघीही आता धमेंद्र यांची भेट घेण्यासाठी व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. वरिंदर चावला या पापाराझी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
ब्रीच कँडी रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केल्याचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोमवारी रात्री ( १० नोव्हेंबर ) देओल कुटुंबीयांसह सलमान खान, शाहरुख खान, आर्यन खान, अमीषा पटेल, गोविंदा हे सेलिब्रिटी सुद्धा ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री अमीषा पटेलला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या देओल कुटुंबीयांनी प्रायव्हसीचा आदर करून खोट्या बातम्या पसरवू नका अशी विनंती सर्वांना केली आहे.
धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर पंजाबमधील लुधियाना येथील एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला. त्यांनी १९५४ मध्ये म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.
