१९९२ साली आलेल्या ‘विश्वात्मा’ चित्रपटात सनी देओल, दिव्या भारती व चंकी पांडे यांनी काम केलं होतं. या चित्रपटातील ‘सात समुंदर पार’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या आयकॉनिक गाण्यासाठी आजही दिवंगत दिव्या भारतीची आठवण काढली जाते. ‘विश्वात्मा’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी दिव्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. दिव्याला स्क्रीन टेस्टशिवाय चित्रपटात घेतलं होतं, असा खुलासा त्यांनी केला.
रेडिओ नशा ऑफिशियलशी बोलताना राजीव राय म्हणाले, “दिव्याला बॉलीवूडमध्ये मीच आणलं. “ती एक-दोनदा माझ्या ऑफिसमध्ये आली होती. तिच्याशी बोलताना मला काळजी वाटत होती, कारण मला तिला घेण्याबद्दल खात्री पटली नाही. दुसऱ्यांदा ती आली तेव्हा ती रडली. आणि मग मला जाणवलं की ती प्रामाणिक आहे. ती मला त्रास देणार नाही. पहिल्यांदा मी तिला ओळखू शकलो नाही. दुसऱ्यांदा मला वाटलं की ती खूप चांगली मुलगी आहे. मी तिची स्क्रीन टेस्टही घेतली नाही.”
ते गाणं दिव्या भारतीचं आहे – राजीव राय
पुढे ते म्हणाले, “मला वाटलं की ही भूमिका फार चांगली नव्हती, म्हणून मी तिला दोन-तीन चित्रपटांसाठी साइन केलं. ती खूप आनंदी होती आणि आम्ही चांगले मित्र झालो. तिने काहीच त्रास दिला नाही. मी तिला एक गाणं द्यायचं ठरवलं होतं, पण ते तिच्या आयुष्यातील आणि आपल्या सर्वांसाठी सर्वोत्तम गाणं असेल याची कल्पना मी केली नव्हती. त्यामुळे मला अनेकदा आनंद होतो की ती आता आपल्यात नसली तरी त्या गाण्याने मी तिच्या आयुष्यात योगदान दिलं आहे. ते गाणं दिव्या भारतीचं आहे. आणि लोक नेहमीच त्या गाण्यासाठी तिची आठवण काढतील, कारण त्यात ती खूप छान नाचली आहे.”
…तर ती खूप मोठी स्टार असती
‘विश्वात्मा’ मध्ये दिव्या भारतीबरोबर अभिनेत्री सोनम खाननेही काम केलं होतं. तिनेही दिव्याबरोबरच्या आठवणी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या होत्या. “हा माझा शेवटचा चित्रपट होता. आम्ही सेटवर खूप विनोद करायचो आणि हसायचो. ती आज असती तर खूप मोठी स्टार असती,” असं सोनम दिव्याबद्दल म्हणाली होती.

‘विश्वात्मा’ नंतर दिव्या भारतीने मागे वळून पाहिलं नाही. त्याच वर्षी तिचे १२ चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यात शाहरुख खानबरोबरचा ‘दीवाना’ आणि ‘दिल आशना है’ यांचा समावेश होता. शाहरुखने ज्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा दिव्याने २० हून अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘शोला और शबनम’च्या सेटवरच तिची ओळख अभिनेता गोविंदाच्या माध्यमातून निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्याशी झाली. त्याच वर्षी त्यांनी लग्न केलं होतं.
दिव्याचं फिल्मी करिअर प्रचंड यशस्वी राहिलं, पण ५ एप्रिल १९९३ रोजी तिच्याबरोबर दुर्दैवी घटना घडली. दिव्या भारतीचे अवघ्या १९ व्या वर्षी मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून निधन झाले. तिचं निधन हा फिल्म इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.
दिव्याच्या मृत्यूनंतर बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. पण दिव्याच्या वडिलांनी सर्व अफवा फेटाळून लावत लेकीचं निधन फक्त एक अपघात होता, असं म्हटलं होतं.