This Famous Actress Says Her In laws Didn’t Allowed Her To Act After Marriage : स्त्री कलाकारांच्या बाबतीत अनेकदा असं होताना दिसतं की, लग्नानंतर किंवा मुलांच्या जन्मानंतर त्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतात. किंवा काही वेळा त्यांची काम करण्याची इच्छा असली तरी त्यांना घरून तितका पाठिंबा मिळत नाही. असंच काहीसं लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर झालेलं.
‘एक चतुर नार’ या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री दिव्या खोसलानं नुकतच एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. दिव्या खोसलानं ‘टी सीरिज’चे चेरअमन भूषण कुमारबरोबर २००५ साली लग्न केलं होतं. अभिनेत्रीनं सांगितलं की, लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी विरोध केला होता.
लग्नानंतर नव्हती अभिनय क्षेत्रात काम करण्याची परवानगी – दिव्या खोसला
भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीत ती याबद्दल म्हणाली, “मी खूप लवकर लग्न केलं. ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’च्या प्रदर्शनापूर्वीच माझं लग्न ठरलेलं. मग माझं लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला अभिनय करण्यासाठी परवानगी दिली नव्हती.”
दिव्यानं पुढे सांगितलं की, त्यानंतर मग तिनं एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये काम केलं. नंतर लोकप्रिय गायक सोनू निगमच्या वडिलांबरोबर अगम निगम यांच्यासह तिनं एका म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केलं, जो खूप गाजला. ती म्हणाली, “मी खूप लहान होते. त्यावेळी शिक्षण घेत होते. तेव्हा मी सिनेमॅटोग्राफी शिकले, एडिटिंग शिकले.”
दिव्याचा ‘एक चतुर नार’ नावाचा कॉमेडी-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिव्यानं अर्चना पूरन सिंह यांच्याशी संवाद साधताना या चित्रपटातील भूमिकेसाठी तिनं कशी मेहनत घेतली याबद्दल सांगितलं आहे. दिव्या म्हणाली, “मला उत्तर प्रदेशमध्ये बोलली जाणारी भाषा येत नव्हती; पण मी ती शिकले त्यासाठी मी सराव केला. या व्यतिरिक्त नंतर आमच्या ‘एक चतुर नार’ चित्रपटाच्या दिग्दर्शकानं मला जवळपास एक महिनाभर झोपडपट्टीत राहण्यास भाग पाडलं.”
दरम्यान, ‘एक चतुर नार’ चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केलं असून, त्यामध्ये दिव्या खोसलाबरोबर नील नितीन मुकेश, सुशांत सिंह, रजनीश दुग्गल, छाया कदम आणि इतर काही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत.