चित्रपटाच्या माध्यमातून एखादा काळ उभा करणं ही काही सोप्पी गोष्ट नाही. हॉलिवूडमध्ये स्टीवन स्पीलबर्ग हे दिग्दर्शक यात माहिर आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. १९७५ साली आलेला शार्क माशावर बेतलेला ‘Jaws’ हा चित्रपट असो किंवा १९९३ साली आलेला ज्यू नरसंहारावर बेतलेला ‘Schindler’s List’ असो, ‘ज्यूरासिक पार्क’सारखा अविस्मरणीय अनुभव देणारी सीरिज असो किंवा ‘Saving Private Ryan’ व ‘Bridge of Spies’सारखे युद्ध व त्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेले चित्रपट असो. स्पीलबर्ग यांचे चित्रपट प्रेक्षकांना त्या काळात खेचून घेऊन जातात इतकं त्यांनी त्यातील बारकावे आणि छोट्या छोट्या गोष्टींवर मेहनत घेतलेली असते. भारतीय चित्रपटसृष्टीतसुद्धा के आसिफसारखे दिग्दर्शक होऊन गेले पण त्यानंतर ही गोष्ट फारशी कुणालाजमलेली नाही, परंतु एक दिग्दर्शक आहे ज्याला भारतीय चित्रपटसृष्टीचा स्पीलबर्ग म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही, ते म्हणजे संजय लीला भन्साळी!
आपल्या लांबलचक फिल्मी करिअरमध्ये केवळ १० चित्रपटच दिग्दर्शित करणाऱ्या संजय लीला भन्साळी यांना स्पीलबर्गच्या बरोबर नेऊन बसवण्यामागील एकमात्र कारण ते म्हणजे त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्या लेन्समधून दिसणारं कथानकातलं विश्व अन् सादरीकरण हे प्रेक्षकांना खेचून त्या काळात घेऊन जातं. मग तो ‘हम दिल दे चुके सनम’सारखा प्रेमाचा त्रिकोण असो, ‘देवदास’सारख्या अजरामर कलाकृतीचं भव्य पद्धतीने भव्य पद्धतीने सादरीकरण असो, ‘ब्लॅक’सारख्या चित्रपटातून एका गंभीर समस्येवर भाष्य करणं असो, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’सारखे ऐतिहासिक विषय हाताळणे असो किंवा ‘गंगूबाई काठियावाडी’ सारखा कमर्शियल बायोपिक असो. या प्रत्येक चित्रपटात जो काळ भन्साळी यांनी उभा केला आहे त्यात प्रेक्षक अक्षरशः हरवून जातो.
चित्रपटविश्वात दमदार काम केल्यावर आता भन्साळी हे ओटीटीवर दणक्यात एंट्री करणार आहे. असाच एक भव्यदिव्य विषय भन्साळी नेतफ्लिक्स सीरिजच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे ‘हीरामंडी’. गेली २ वर्षं भन्साळी यांच्या या प्रोजेक्टबद्दल मनोरंजनविश्वात प्रचंड चर्चा होती. नुकताच या सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आणि भन्साळी यांनी यावर किती मेहनत घेतली आहे याची झलकदेखील यात पाहायला मिळाली. अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने भन्साळी हा विषय सादर करणार यात काहीच वाद नाही, पण ‘हीरामंडी’मागचा नेमका इतिहास अन् इतर काही रंजक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
‘हीरामंडी’ हा पाकिस्तानच्या लाहोर शहरातील एक फार जुना परिसर आहे. याआधी हा परिसर ‘शाही मोहल्ला’म्हणून ओळखला जायचा. हिरा सिंग यांचे सुपुत्र ध्यान सिंग डोगरा यांच्या नावा वरुन या परिसराला ‘हीरामंडी’ हे नाव पडले. ध्यान सिंग डोगरा हे महाराज रणजीत सिंग यांच्या राज्यात शीख साम्राज्याचे प्रधान होते. १४ व्या आणि १५ व्या शतकात म्हणजेच मुघल काळात ‘हीरामंडी’ हा परिसर वेश्या व्यवसायाचं केंद्र बनला होता अन् बऱ्याच लोकांना हा परिसर केवळ त्यामुळेच जास्त लक्षात राहिला. अफगाणिस्तान व उझबेकिस्तान या परिसरातून लुटमार करून जेव्हा मुघल आपल्याबरोबर स्त्रियांना घेऊन येत असत तेव्हा त्यांना या परिसरात भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवलं जायचं अन् त्यांचे नृत्य पाहण्यासाठी प्रामुख्याने ‘हीरामंडी’चा वापर केला जायचा असं सांगितलं जातं.
अहमद शहा अब्दालीने आक्रमण केल्यानंतर ‘हीरामंडी’मध्ये वेश्या व्यवसाया वाढू लागला. आपल्याबरोबर बंदी म्हणून आणलेल्या स्त्रियांना यासाठी जबरदस्ती तयार केले जात असे. त्यांना नृत्य, शृंगार, चालीरीती, सगळं शिकवलं जायचं. ब्रिटिश काळात या परिसराची आणखी बदनाम करण्यात आली. दिवसा नेहमीप्रमाणे अन्न, कपडे, वाद्य, मुघल पादत्राणे, आणि इतर वस्तु या बाजारात विकल्या जायच्या अन् रात्री मात्र हा बाजार वेश्या व्यवसायासाठी खुला व्हायचा अशी एकंदर इथली रीत होती. भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’च्या फर्स्ट लूकवरुन तर हे स्पष्ट होत आहे की या संपूर्ण इतिहासाबद्दलच आपल्याला या सीरिजमध्ये गोष्ट अनुभवायला मिळणार आहे. मुघल काळातील ‘तवायफ संस्कृती’ अन् त्यामध्ये भरडल्या जाणाऱ्या निष्पाप महिला अन् ‘हीरामंडी’चा इतिहास या भव्य सीरिजमधून आपल्यासमोर येणार आहे.
पण पाकिस्तानी लोक मात्र भन्साळी यांच्या या सीरिजच्या विरोधात आहेत. एखादा भारतीय फिल्ममेकर भारतात राहून पाकिस्तानविषयी चित्रपट कसा बनवू शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. जेव्हा २०२१ मध्ये या प्रोजेक्टची घोषणा झाली तेव्हाच उषना शाह या पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्वीट करत भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’वर आक्षेप घेतला होता. अशा बऱ्याच कलाकारांनी तसेच पाकिस्तानी प्रेक्षकांनी या सीरिजला विरोध केला होता.
प्रसिद्ध लेखक मोईन बेग यांनी १४ वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांना ‘हीरामंडी’ या प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन केले होते व ही कहाणी त्यांच्या सुपूर्त केली होती. त्यावेळी भन्साळी शाहरुख खानच्या ‘देवदास’मध्ये व्यस्त होते. नंतरही भन्साळी यांनी यात फार रस न दाखवल्याने मोईन बेग यांनी आपली कथा भन्साळी यांच्याकडून पुन्हा मागितली. सर्वप्रथम ही कथा चित्रपट रूपात सादर होणार होती पण आता नेटफ्लिक्ससारख्या बड्या प्लॅटफॉर्मवर ही सीरिज झळकणार याचा विचार कुणीच केला नसेल. अद्याप या सीरिजबद्दल फार माहिती समोर आलेली नाही शिवाय याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झालेली नाही. या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा, शर्मिन सेगल, संजिदा शेखसारख्या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत. मोठ्या पडद्यावर आपल्या भव्यदिव्य स्टाइलने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संजय लीला भन्साळी यांची हीच जादू ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चालणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असेल.