Emraan Hashmi on Yami Gautam: इमरान हाश्मी हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. लवकरच तो एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हक असे या चित्रपटाचे नाव आहे. इमरान हाश्मीबरोबर यामी गौतमदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहे.
आता नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने यामी गौतमबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्याने नुकतीच द हॉलीवूड रिपोर्टरला मुलाखत दिली.
“काही लोक तर शूटिंगसाठी येतसुद्धा…”
या मुलाखतीत यामी गौतमबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता इमरान हाश्मी म्हणाला, “ती काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी वेळेवर येते. ती माझ्याप्रमाणेच वेळेवर सेटवर यायची. त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना कोणतीही अडचण आली नाही.”
कलाकार आजही शूटिंगसाठी उशिरा येतात का? यावर अभिनेता म्हणाला, “काही लोक तर शूटिंगसाठी येतसुद्धा नाहीत. ते शूटिंग रद्द करतात. मला अशा लोकांबरोबर काम करण्याची इच्छा आहे जे या चित्रपट बनण्याच्या संपू्र्ण प्रक्रियेचा आनंद घेतात. असे लोक, कलाकार आजूबाजूला असतील तर जास्त विचार करण्याची गरज वाटत नाही. जिथे लोक नीट काम करत नाही तिथे ऊर्जा वाया जाते. मग इतरांच्या वेळेनुसार काम करावे लागते.”
हक या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक केसवर आधारित हा चित्रपट आहे. अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम या खटल्यावर प्रेरित हा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की यामी गौतम ही शाझिया बानो या वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. जी तिच्या पतीच्या विरोधात लढते. अब्बास असे तिच्या पतीचे नाव आहे. अब्बास ही भूमिका अभिनेता इमरान हाश्मीने साकारली आहे.
या चित्रपटात वर्तिका सिंह, दानिश हुसैन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, यामी यावर्षी धूम धाम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात प्रतीक गांधी प्रमुख भूमिकेत होता. धूम धाम चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर इमरान आर्यन खान दिग्दर्शित वेब सीरिजमध्ये दिसला होता. यामध्ये त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
