बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल ही लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहे. ईशा नेहमी तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलताना दिसते. ईशाने नुकतीच एक मुलाखत दिली असून, त्यामध्ये तिने तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत, तसेच तिच्या आईने तिला दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत तिने आर्थिक स्वातंत्र्य, तसेच मातृत्वाबद्दल आणि ती तिच्या मुली राध्या व मिराया यांच्याबद्दलही सांगितलं आहे. त्यामध्ये तिने तिची आई हेमा मालिनींबद्दलही सांगितलं आहे. आर्थिक स्वातंत्र्याबद्दल ती म्हणाली, “ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अशा जगात राहतो, जिथे पैशांशिवाय काहीही होऊ शकत नाही आणि मला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायला आवडत नाही. मी माझ्या मुलींनाही तेच शिकवणार आहे की कोणावरही अवलंबून राहायचं नाही.”

ईशा पुढे हेमा मालिनी यांच्याबद्दल म्हणाली, “ती मला खूप सल्ले देत असते. आई कधीच फक्त एक सल्ला देत नाही. ती सतत खूप गोष्टी सांगत असते, सल्ले देत असते. तिने दिलेले सल्ले माझ्यासाठी खूप मौल्यवान असतात. तिनं मला एकच नाही, तर खूप महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. आईने दिलेले सल्ले नेहमी आपल्याबरोबर असतात. तिनं मला जे सांगितलं, शिकवलं, सल्ला दिला, ते मी माझ्या मुलींना देईन.”

मातृत्वाबद्दल ईशा म्हणाली की, “आई झाल्यानंतर अनेकदा काम करताना, मुलांना सोडून कामावर जाताना अपराधीपणाची भावना मनात येते; पण मी ती टाळते. मी अशीच कामं करते, जी मला जमतील. ज्याबद्दल मला माहिती असते आणि आई झाल्यानंतर मी सर्व गोष्टी अजून काळजीपूर्वक करते”.

दरम्यान, ईशा देओलने ‘कोई मेरे दिल से पूछो’, ‘धूम’, ‘चुरालीया हैं तुमने’, ‘क्या दिल ने कहा’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘शादी नंबर १’, ‘आँखें’, ‘प्यारे मोहन’, ‘नो एन्ट्री’, ‘इन्सान’, ‘हायजॅक’, ‘डार्लिंग’, यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. तिने ‘कोई मेरे दिल से पूछो’ यांमधून पदार्पण केले होते. तर, २००२ साली आलेल्या या चित्रपटात तिच्यासह आफताब शिवदासानी, जया बच्चन, राजपाल यादव, संजय कपूर हे कलाकार झळकले होते.