Esha Deol and her ex-husband Bharat Takhtani: अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती तिचा एक्स पती भरत तख्तानीमुळे मोठ्या चर्चेत आली आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करीत तुझे कुटुंबात स्वागत आहे, असे लिहिले. त्यामुळे त्याची मोठी चर्चा रंगली आहे. ईशा देओल व भरत तख्तानी यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुली आहेत. राध्या व मिराया अशी त्यांची नावे आहेत. भरत व ईशा यांनी १२ वर्षांच्या संसारानंतर २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. अशातच ईशाच्या एका जुन्या मुलाखतीमधील वक्तव्य सध्या चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे.
ईशा देओल म्हणाली…
लग्नानंतर ईशा व भरत तख्तानीने ‘फिल्मफेअर शॉर्टली’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती म्हणाली होती की, मी तख्तानी कुटुंबातील मोठी सून आहे. भरतला अजून सहा भाऊ आहेत. सत्ते पे सत्ता या चित्रपटात हेमा मालिनीची म्हणजेच माझ्या आईची जशी भूमिका, तशीच मी खऱ्या आयुष्यात असल्यासारखे मला वाटत होते. तसेच अभिनेत्रीने असाही खुलासा केला होता की, लग्नानंतर भरतच्या तिच्याकडून काय अपेक्षा होत्या. याबरोबरच हेमा मालिनीने तिला काय सल्ला दिला होता, याबद्दलही ईशाने वक्तव्य केले होते.
अभिनेत्री म्हणाली, “लग्नानंतर माझे वजन वाढू नये, असे भरतला वाटते. त्यामुळे आम्ही लवकरच अष्टांग योग क्लासेसला जाणार आहोत. तसेच मी जरी लग्नानंतरही काम करीत असले तरी मी माझ्या पत्नीच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये पार पाडावीत यासाठी आई मला सल्ले देत असते. मी माझ्या नवऱ्याच्या आधी उठले पाहिजे, सासूला कामात मदत केली पाहिजे, माझ्या नृत्याकडे दुर्लक्ष करू नये, असे अनेक सल्ले आई देत असते.”
याच मुलाखतीत भरत तख्तानी ईशाबद्दल म्हणाला, “तिला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो. ती माझ्या आईची काळजी घेते. तिला कोणत्या गोष्टी आवडतात, तिचा मूड कसा आहे, याची काळजी घेते, ती खूप चांगली आहे. एक जबाबदार व्यक्ती आहे, सर्वांची काळजी घेते. मला कशामुळे आनंद मिळतो, याची तिला जाणीव आहे. मी खवय्या आहे, मी खाण्यासाठी जगतो. ती माझे आवडते पदार्थ घरीच बनवले जातील याची काळजी घेते”, असे म्हणत त्याने ईशाचे कौतुक केले. ईशा पुढे असेही म्हणाली की, जेव्हा मी भरतला भेटले तेव्हा चहा कसा बनवायचा हेदेखील मला माहीत नव्हते. पण, त्याला खूश करण्यासाठी मी या गोष्टी शिकले.
दरम्यान, ईशा व भरत यांनी सहमतीने वेगळं व्हायचा निर्णय घेतला असून मुलींचं संगोपन एकत्र करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.