Dharmendra Home Video Viral : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ३१ ऑक्टोबरपासून धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी कुटुंबीय अपडेट्स शेअर करत आहेत. याचदरम्यान त्यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.

आज सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्या होत्या, त्यानंतर मोठा गोंधळ झाला. हेमा मालिनी व ईशा देओल यांनी पोस्ट करून धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची अपडेट दिली आणि मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला.

मुंबईतील जुहू परिसरात धर्मेंद्र यांचं घर आहे. त्यांच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धर्मेंद्र यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इन्स्टंट बॉलीवूड या पापाराझी अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

धर्मेंद्र बरे व्हावे, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे, घराबाहेर वाढलेला पोलीस बंदोबस्त आणि चाहत्यांची गर्दी पाहून काळजीचं वातावरण आहे. सकाळी ईशा देओल व हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर देओल कुटुंबातील कोणत्याच सदस्याने पोस्ट केलेली नाही.

सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, करण देओल, हेमा मालिनी हे सर्वजण सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात होते. दुसरीकडे धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओल धर्मेंद्र यांच्या घरी गेला होता. धर्मेंद्र यांच्या घरीही गाड्यांची ये-जा सुरू आहे. एकूणच घराबाहेरची गर्दी पाहता नेमकं काय घडतंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

८९ वर्षांचे धर्मेंद्र वाढत्या वयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल आहेत. डिसेंबर महिन्यात त्यांचा ९० वा वाढदिवस आहे. धर्मेंद्र लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.