Farah Khan Scolded Ameesha Patel During Kaho Naa Pyaar Hai : फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका व कोरिओग्राफर आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे, तर अनेक दिग्गज कलाकारांना नृत्य शिकवले आहे. अशातच बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकताच तिच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

फराह खान सध्या तिच्या यूट्यूब चॅनेलवरील ब्लॉगमुळे खूप चर्चेत असते. यामार्फत ती अनेक कलाकारांना भेटून त्यांच्यासह जेवण बनवत गप्पा मारताना दिसते. अशातच नुकतीच तिने बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेलची भेट घेतली. यावेळी अमिशाने फराह खानसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

अमिशा पटेल आजही तिच्या ‘कहो ना प्यार हैं’ चित्रपटासाठी ओळखली जाते. यातील तिचा अभिनय, विशेष करून तिचं व हृतिक रोशनचं थायलँडमधील समुद्राजवळ चित्रीत झालेलं गाणं अनेक तरुणांच्या आवडीचं आहे. आजही त्या गाण्याची क्रेझ कायम आहे. या चित्रपटासाठी फराह खाननेच नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम केलेलं. आता अमिशाने त्या चित्रपटासाठी फराह खानकडून नृत्य शिकतानाचा अनुभव सांगितला आहे.

अमिशा पटेलने सांगितला फरहा खानसह काम करण्याचा अनुभव

फराह खान नुकतीच तिच्या ब्लॉगनिमित्त अमिशाच्या घरी गेली होती. त्यादरम्यान अमिशाने याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, “फराह मला व हृतिकला खूप ओरडायची. ‘कहो ना प्यार हैं’च्यावेळी ती आम्हाला आई-बहिणीवरून शिव्या द्यायची. ओरडून ओरडून शिकवायची. अनेकदा ती मला व हृतिकला बोलायची.” फराह यावेळी म्हणाली, “ही खोटं बोलतेय. मी हृतिकला कधी शिव्या दिल्या नाही, फक्त अमिशाला शिव्या द्यायचे.”

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार दिवसांपूर्वी अमिशाने पापाराझींशी संवाद साधताना हल्लीच्या चित्रपटांना पूर्वीप्रमाणे यश मिळत नाही असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर ‘आस्क मी’ हे सेशन घेतलं होतं. यावर तिला हृतिक रोशन व ‘सैयारा’ फेम अहान पांडेबद्दल विचारण्यात आलेलं. यावर ती म्हणालेली, बाप बाप असतो, मी अजून ‘सैयारा’ पाहिला नाहीये; पण मी त्यांना शुभेच्छा देते. अहान खूप चांगला अभिनेता आहे, पण बाप बाप असतो आणि मुलगा मुलगा असतो. हृतिक कायमच इतर कलाकारांपेक्षा खूप पुढे होता.

दरम्यान, ‘कहो ना प्यार हैं’बद्दल बोलायचं झालं, तर २००० साली हा चित्रपट प्रदर्शित झालेला. हृतिक रोशन व अमिशा पटेल यात मुख्य भूमिकांत होते. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजलेला; आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षांचा कालावधी लोटला आहे.