Farah Khan Trolling Response : बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शिकांपैकी एक म्हणजे फराह खान. अनेक बॉलीवूड सिनेमांमुळे चर्चेत असलेली फराह सध्या तिच्या यूट्यूब चॅनेलमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी जाऊन ती जेवण करतानाचे व्हिडीओ बनवते आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करते. तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असल्याचं पाहायला मिळतं.
फराह खान आणि तिचा कुक दिलीप यांच्यातील मजेदार केमिस्ट्रीमुळे ते दोघेही यूट्युबवर अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यातील मजेदार संवाद आणि प्रवासाचे व्हिडीओ प्रेक्षकांनाही खूप आवडतात. फराहच्या या यूट्यूब चॅनलमुळे कुक दिलीपदेखील प्रकाशझोतात आला आहे. फराहमुळे तिचा कुक दिलीपही आता सेलिब्रिटी झालाय, असं म्हणायला हरकत नाही.
सध्या अनेक कार्यक्रमांत फराहबरोबर दिलीपही स्पॉट होताना दिसतो. फराहप्रमाणेच दिलीपलासुद्धा पापाराझी फॉलो करतात आणि त्याचे फोटो-व्हिडीओ काढताना दिसतात. अशातच फराहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॉमेडियन मुनव्वर फारूकी आणि आशीष चंचलानीबरोबर फराह फोटोसाठी पोज देत होती. त्याचवेळी दिलीपही त्या व्हिडीओमध्ये येण्याचा प्रयत्न करतो; पण तेव्हा फराह त्याला बाजूला करीत, “मधे-मधे येऊ नकोस आणि जास्त उडू नकोस”, असं म्हणते.
फराह खान व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच दिलीपबरोबरच्या वागणुकीबद्दल फराहवर नेटकरी टीका करीत आहेत. सोशल मीडियावर फराहला ट्रोल केलं जात आहे. मात्र या ट्रोलर्सला फराहनं स्वत: उत्तर दिलं आहे. ‘Reel vs Reality’ अशी कॅप्शन असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याद्वारे फराहच्या दुटप्पीपणावर टीका केली जात आहे.
व्हायरल व्हिडीओवर फराह खानचं उत्तर

याच व्हिडीओच्या कमेंट्समध्ये स्वत: फराहनं उत्तर दिलं आहे. फराह म्हणते की, “कोणीही जास्त गर्विष्ठ होऊ नये, हे महत्त्वाचं आहे. मी माझ्या मुलालाही हेच सांगितलं असतं. पाहुण्यांना कायमच महत्त्व दिलं पाहिजे” दरम्यान, फराहच्या या उत्तरावरसुद्धा काहींनी तिला ट्रोल केलं आहे; तर अनेकांनी तिची बाजू घेतली आहे. फराह आणि दिलीप यांच्यातील नातंच असं आहे, त्यामुळे फराह दिलीपला गमतीत ‘उडू नकोस’ म्हणाल्या असाव्यात, असं मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.