ड्रायव्हरला चाकूने भोसकून जखमी केल्याप्रकरणी दिग्दर्शक मनीष गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हरच्या पगारावरून वाद झाला होता. भांडणानंतर गुप्ता यांनी ड्रायव्हरवर चाकूने हल्ला केला. या घटनेत ड्रायव्हर जखमी झाला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री सागर संजोग इमारतीत गुप्ता यांच्या राहत्या घरी ही घटना घडली, असे वर्सोवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितलं. गुप्ता यांनी त्यांच्या घरी तीन वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या राजीबुल इस्लाम लष्कर (३२) याला जखमी केल्याचा आरोप आहे, असं अधिकारी म्हणाले.
गुप्ता यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८(२), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण अद्याप त्यांना अटक झालेली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं. लष्करचे वकील अली काशिफ खान यांनी गुप्ता यांच्या अटकेची मागणी केली आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये म्हटलंय की लष्कर मागील ३ वर्षांपासून मनीष गुप्ता यांच्याबरोबर काम करत होता. त्याचा पगार २३,००० रुपये होता, पण गुप्ता यांनी कधीच वेळेवर पगार दिला नाही, असा आरोप लष्करने केला. ३० मे रोजी गुप्ता यांनी लष्करचा पगार न देता त्याला कामावरून काढून टाकले. पगाराची थकबाकी हवी असल्याने लष्कर पुन्हा कामावर आला, पण तरीही त्याला पैसे दिले गेले नाहीत, असा त्याने दावा केला. यानंतर शुक्रवारी रात्री मनीष गुप्तांच्या वर्सोवा येथील घरी लष्करचा वाद झाला. शाब्दिक वादानंतर गुप्ता यांनी स्वयंपाकघरातील चाकूने वार केल्याचा आरोप लष्करने केला आहे.
जखमी झाल्यावर लष्कर जवळच्या कूपर रुग्णालयात पोहोचला, तिथे त्याने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यात मनीष गुप्ताविरोधात तक्रार दाखल केली.
मनीष गुप्ता कोण आहेत?
पटकथा लेखक आणि दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनी ‘द स्टोनमन मर्डर्स’ आणि ‘420 आयपीसी’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी शेवटचा दिग्दर्शित केलेला चित्रपट २०२३ मध्ये आलेला ‘वन फ्रायडे नाईट’ होता. यात रवीना टंडन व मिलिंद सोमण यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. मनीष गुप्ता यांनी यापूर्वी रामगोपाल वर्मांच्या टीममध्ये लेखक म्हणून काम केलं होतं. ‘डी’ आणि ‘सरकार’ या चित्रपटांचे ते पटकथा लेखक आहेत.