Genelia Deshmukh On Sharing Bills With Ritiesh Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल आहे. हिंदीसह मराठीतही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अलीकडेच जिनिलीया ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशातच आता अभिनेत्रीने तिचा नवरा रितेशबद्दल सांगितलं आहे. जिनिलीयाने ती रितेशसह सर्व बिल शेअर करते असं म्हटलं आहे.

जिनिलीयाने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने रितेशबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी नेहमी काम करत असते. मी कायम रितेशबरोबर बिल शेअर करते. काहीवेळा तो बिल भरतो तर काही वेळा मी बिल भरते. मी कधीच फक्त त्याला बिल भरू देत नाही. आजही मी असंच करते.”

जिनिलीया पुढे रितेशबद्दल म्हणाली, “असं काही नाहीये की दरवेळी फक्त मुलानेच पैसे किंवा बिल भरायला हवे आणि आता तर मी नियमितपणे हे करतेच, कारण लोक मला बोलतील की, तू तर रितेश देशमुखबरोबर असतेस वगैरे, आणि याचीच मला भीती असते. मला अजूनही आठवतं की तो जेव्हा माझ्यासाठी महागड्या भटवस्तू आणायचा तेव्हा मी त्याला सांगायचे की, आता तू हे आणलं आहेस, पण पुढचं एक वर्ष तू माझ्यासाठी काहीही खरेदी करायचं नाहीस.”

जिनिलीया याबाबत पुढे म्हणाली, “आजही रितेश व मी आम्ही दोघेही आमच्या मुलांसाठी काम करतो. असं काही नाहीये की ही फक्त त्याची एकट्याची जबाबदारी आहे किंवा कुटुंबाकडे बघणं ही त्याचीच जबाबदारी आहे, मीसुद्धा त्याला यामध्ये मदत करते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून झळकली होती. यामधून तिने पहिल्यांदाच आमिर खानसह काम केलेलं. यानंतर आता जिनिलीया ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, यामध्ये ती कोणत्या भूमिकेतून झळकणार आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. रितेश देशमुख या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर त्यानेच या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे.