ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे. गोवर्धन असरानी असं त्यांचं नाव होतं. मात्र त्यांना प्रेक्षक असरानी म्हणूनच ओळखत. विविध चित्रपटांमध्ये असरानी यांनी भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाचे रंग विविध भूमिकांमध्ये भरणारा हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईतल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. असरानी यांच्या निधनाने विनोदी भूमिका साकारणाऱ्या एक हरहुन्नरी कलाकाराला हिंदी चित्रपटसृष्टी मुकली आहे. असरानी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या विविध ढंगी भूमिका साकारल्या आहेत.

असरानी सोशल मीडियावर होते सक्रीय

असरानी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय होते. इन्स्टाग्रामवर ते त्यांचे जवळपास साडे सहा लाख फॉलोअर्स होते. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी ते याच मंचावर उत्स्फूर्तपणे शेअर करायचे. अगदी तरुण वयापासूनच त्यांनी सिनेसृष्टीत अभिनय करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात साकारलेल्या भूमिकांचे काही व्हिडीओ ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करायचे.

शेवटच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?

निधन होण्याच्या काही तास अगोदरच असरानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती. सध्या दिपावलीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. या स्टोरीमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये प्रज्वलीत झालेले दिवे दिसत आहेत. सोबतच हॅपी दिवाळी असा एक संदेश या फोटोमध्ये देण्यात आला आहे. असरानी यांनी ही पोस्ट केली होती त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमीच आली. त्यामुळे चाहत्यांना हॅपी दिवाळी म्हणणं हाच त्यांचा शेवटचा संदेश ठरला.

Asrani Last Post
असरानी यांची शेवटची पोस्ट हीच ठरली. (फोटो-असरानी, इन्स्टाग्राम पेज)

असरानी यांच्यासाठी चित्रपट सृष्टीचा प्रवास सोपा नव्हता

असरानी यांनी राजस्थानच्या महाविद्यालयातून पदवी घेतली होती. शिक्षण संपल्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. २००४ मध्ये असरानी यांनी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक नेत्यांचा प्रचार केला होता. असरानी यांच्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीत येणं सोपं नव्हतं. गुड्डी या चित्रपटातली त्यांची भूमिका गाजली. असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला व्यावसायिक अभिनेता सुरुवातीला कुणी मानायला तयारच नव्हतं. गुलजार एकदा मला म्हणाले होते की तू व्यावसायिक अभिनेता नाही तुझा चेहरा विचित्र आहे. मात्र माझा अभिनय पाहून त्यांनी कौतुकही केलं होतं अशी आठवण असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.