Actor Govinda’s Wife Sunita Ahuja Reaction On Divorce Rumours : बॉलीवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा हे दोघं लग्नानंतर ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात सुनीता आहुजाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचा दावा हॉटरफ्लायने त्यांच्या वृत्तात केला होता, तेव्हापासून सर्वत्र गोविंदा व सुनीता आहुजा विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या.
मात्र, गोविंदाची मुलगी, कौटुंबिक वकील आणि व्यवस्थापकांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं होतं. गोविंका व सुनीजा आहुजा या दोघांनीही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
अखेर गणेश चतुर्थीचा सण या दोघांनी एकत्र साजरा करत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी गोविंदा व सुनीता यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. दोघांनी यादरम्यान Twinning लूक केला होता. गोविंदाने मजंठा रंगाचा कुर्ता तर, सुनीता यांनी त्याच सेम रंगाची साडी नेसली होती. या दोघांनी सर्वांना अभिवादन केलं, मिठाई वाटली आणि त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांना चांगले आशीर्वाद द्या असं गोविंदाने सर्वांना सांगितलं.
गोविंदा म्हणाला, “गणेशोत्सवानिमित्त आज संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. बाप्पाचा प्रत्येकाला आशीर्वाद मिळतो, यामुळे कुटुंबावरील सगळी संकटं दूर होतात, दु:ख नाहीसं होतं. मला आज विशेषत: माझा मुलगा यश आणि टीनासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही सर्वांनी त्या दोघांना कायम पाठिंबा द्या. त्यांच्यावर खूप प्रेम करा…मी त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतो. यश आणि टीना या माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापेक्षा भरभरून यश मिळो हीच प्रार्थना आहे.”
यानंतर गोविंदा व सुनीता यांना त्यांच्यातील वादाबद्दल विचारण्यात आलं, यावेळी सुनीता म्हणाल्या, “आज गणपती बाप्पा आलेत आणि तुम्ही लोक इथे आमच्यातील वाद ऐकण्यासाठी आला आहात का? असा कोणताही वाद झालेला नाहीये. गणपती बाप्पा मोरया”
“आमच्यात कोणताही वाद झालेला नाहीये. जर वाद असता तर आज एकत्र आलो नसतो. भांडणं झाल्यावर आम्ही एकत्र दिसू का? कोणीही आम्हाला वेगळं करू शकत नाही. देव पण नाही आणि विरोधकही नाही. तुम्हाला तो डायलॉग माहितीये ना? ‘मेरा पती सिर्फ मेरा है’ तेच मी आता म्हणते ‘मेरा गोविंदा सिर्फ मेरा है’ ( गोविंदा फक्त माझाच ) आम्ही सांगितल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका” असं सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, गोविंदाने मार्च १९८७ मध्ये सुनीता आहुजाशी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला टिना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत.