Gavinda Was First Choice For Gadar : गोविंदा हा ९०च्या काळातील सुपरस्टार होता, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्या काळी त्याची खूप क्रेझ होती. अनेक चित्रपटांत काम करीत त्याच्या दमदार अभिनयानं त्यानं अनेकांची पसंती मिळवली. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असे. परंतु, एकदा गोविंदानं एका सुपरहिट चित्रपटाला नकार दिला होता आणि तो चित्रपट होता ‘गदर’.

बॉलीवूडमधील देशभक्ती, तसेच प्रेमकहाणीवर आधारित गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘गदर’ एक मानला जातो. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची त्या काळी प्रचंड क्रेझ होती. अभिनेता सनी देओल व अमिषा पटेल यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हिट ठरली होती. परंतु, ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी सनी देओल नाही, तर गोविंदाला पहिली पसंती होती.

‘गदर’बद्दल सनी देओलची प्रतिक्रिया

गोविंदानं ‘गदर’ला नकार दिला आणि त्यासाठी सनी देओलला विचारणा झाली. त्यानं ही सुवर्णसंधी वाया न जाऊ देता, तिचं सोनं केलं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का सनी देओललासुद्धा या सिनेमाबद्दल सुरुवातीला गांभीर्य वाटत नव्हतं. त्याबाबत त्यानं ‘झूम’शी संवाद साधताना सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी जेव्हा लोकांना या चित्रपटातील गाणी ऐकवायचो तेव्हा त्यांना ती आवडायची नाही. पण, आता हा चित्रपट आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.”

सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा अनिल शर्मा यांनी त्याला या चित्रपटासाठी विचारलं तेव्हा तो सुरुवातीला या चित्रपटाबद्दल फार उत्सुक नव्हता. परंतु, कथा ऐकल्यानंतर त्यानं चित्रपटासाठी होकार दिला. त्याबद्दल तो म्हणाला, “मला एका रात्री या चित्रपटाची कथा ऐकवली होती. मला तेव्हाच्या तत्कालीन परिस्थितीवर या चित्रपटानं भाष्य करावं, असं वाटत होतं.”

अभिनेता पुढे म्हणाला, “माझ्यासाठी या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता हे मी शब्दांत सांगू शकत नाही. सुरुवातीला कथा थोडी वेगळी होती. मला ती योग्य वाटली नाही. मला कधीच वाटलं नव्हतं की, हा चित्रपट हिट ठरेल” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या काळी याची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ निर्माण झाली होती. ११ ऑगस्ट २०२३ रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता.