Saanand Verma on Gulshan Grover: ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतात. प्रत्येक पात्राचा एक वेगळेपणा पाहायला मिळतो. बोलण्याची, चालण्याची स्टाइल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
मालिकेतील सक्सेनाजी हे पात्रदेखील लोकप्रिय ठरले आहे. सक्सेनाजी सतत कोणाचा तरी मार खाताना दिसतात. भाभीजी घर पर हैं मालिकेतील सक्सेनाजी हे पात्र अभिनेता सदानंद वर्माने साकारले आहे.
“मला मनातून वाटत होते की त्या माणसाचा…”
आता अभिनेता त्याच्या भूमिकेमुळे नाही तर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता फर्स्ट कॉपी या वेब सीरिजमध्ये झकळला आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांनी अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. सदानंदने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली.
या मुलाखतीत सदानंद वर्मा खुलासा करत म्हणाला, “फर्स्ट कॉपीचे शूटिंग करताना गुलशन ग्रोव्हर यांनी मला खरंच कानाखाली मारली होती. त्या क्षणी माझा संताप अनावर झाला होता. मला मनातून वाटत होते की त्या माणसाचा गळा चिरावा. पण, कोणालाही काहीही बोललो नाही. मी आजपर्यंत याबद्दल कुठेही बोललो नाही, या मुलाखतीत मी पहिल्यांदा याबद्दल बोलत आहे; त्यांनी ते जाणूनबुजून केलं होतं.”
याविषयी अधिक बोलताना सदानंद वर्मा म्हणाला, “त्यांनी ती जी कानाखाली मारली होती, ती अभिनयातील नव्हती. जर सीनदरम्यान ते मला खरंच मारणार होते, तर त्यांनी मला आधीच सांगायला हवे होते. जर त्यांनी मला आधी सांगितले असते तर मी त्यासाठी तयार राहिलो असतो. मी त्या सीनमध्ये होतो, माझ्या भूमिकेत होतो. मी तो सीन पूर्ण केला आणि तिथून निघून गेलो, मी कोणालाही काहीही बोललो नाही.”
जेव्हा मुलाखतीत असे विचारले की, सीनमध्ये एखाद्याला कानाखाली मारण्याआधी समोरच्या व्यक्तीला आधी कल्पना द्यावी लागते का? यावर अभिनेता म्हणाला, “आधी सांगणं खूप महत्त्वाचे आहे. पण, त्यांनी मला सांगितलं नाही आणि खूप रागाने मारलं. ते खूप चुकीचे आहे. मला खूप राग आला होता, पण मी कोणाला काही बोललो नाही; कारण मला नकारात्मकतेपासून दूर राहायचे होते. पण, मला वाटत होते की एक खुर्ची घ्यावी आणि त्यांना मारावे, पण तरीही मी हसत राहिलो.”
“मार खाण्यासाठी मी…”
भाभीजी घर पर हैं मालिकेतील अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “अभिनेता म्हणून मी अनेकदा कानाखाली खाल्लेली आहे. मला वाटत नाही कोणत्याही कलाकाराने माझ्याहून अधिकवेळा मार खाल्ला असेल. मार खाण्यासाठी मी ओळखला जातो. भाभीजी घर पर हैं मालिकेतदेखील मला कानाखाली मारलेली आहे. पण, त्याची एक पद्धत असते, ते खरोखर मारत नाहीत.”
राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटातदेखील त्याला कानाखाली मारली गेली होती. त्या चित्रपटाचा अनुभव सांगत सदानंद म्हणाला, “दिग्विजय मला कानाखाली मारणार होता, पण तो खरोखर मारत नव्हता, त्यामुळे दिग्दर्शकाला पाहिजे तसा सीन मिळत नव्हता. त्यावर दिग्दर्शकांना खरोखर कानाखाली मारायला सांगितली. त्यावेळी माझा सहकलाकार दिग्विजयने मला येऊन विचारले. मीदेखील त्यावर सहमती दाखवली. अशा सीनवेळी एक प्रोसेस असते, त्या पद्धतीने काम करायचे असते.”
अभिनेता पुढे म्हणाला, “मी ऐकले आहे की अनिल कपूर यांनीसुद्धा अनेकदा सीनदरम्यान कानाखाली मारली आहे. पण, ते सीननंतर समोरच्या कलाकाराची माफी मागतात. पण, गुलशनजींनी तितकेसुद्धा केले नाही. ते स्वत:वर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. त्यांची वाईट व्यक्ती असण्याची जी प्रतिमा आहे, ते त्या प्रतिमेबरोबर बांधील आहेत. ही प्रतिमा जपण्यासाठी ते अशा गोष्टी करतात”, असे म्हणत सदानंद वर्माने गुलशन ग्रोव्हरबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
