समीर जावळे
ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया,
ये इंसा.. के दुश्मन समाजों की दुनिया,
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…
‘प्यासा’ या चित्रपटातल्या ओळी साहिल लुधियानवी यांनी लिहिल्या आहेत. मात्र गुरु दत्त यांच्या आयुष्याबाबत अतिशय चपखल बसतात.
अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक गुरु दत्त म्हटलं की आपल्या समोर उभे राहतात ते त्यांचे ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘काला बाजार’, ‘भरोसा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’ हे चित्रपट. गुरु दत्त अवघी ३९ वर्षे ते जगले. हिंदी चित्रपटसृष्टीतला वास्तवातला ‘ट्रॅजिडी किंग’ अशी त्यांची ओळख करुन दिल्यास मुळीच वावगं ठरणार नाही. हसतमुख चेहऱ्याचा, चेहऱ्यावर प्रसन्न भाव असलेले गुरु दत्त त्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात वेदना सहन करत होते. याच गुरु दत्त यांची आज १०० वी जयंती.
गुरुदत्त यांची चित्रपटांबाबतची व्हिजन कमालीची
गुरु दत्त यांनी त्यांच्या कारकिर्दीत फार थोडे हिंदी चित्रपट केले. कारण त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी मद्यात झोपेच्या गोळ्या घेऊन आयुष्य संपवलं. पण आजही ते चित्रपट पाहताना काय कमाल व्हिजन असलेला माणूस होता हे आपल्याला कळतं. गुरु दत्त यांचा कागज के फुल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमपटांच्या यादीत अत्यंत वरच्या स्थानावरचा चित्रपट आहे. या चित्रपटात गुरु दत्त, वहिदा रहमान यांच्या भूमिका होत्या. गुरु दत्त यांनी या चित्रपटात एका दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. हा दिग्दर्शक एका मुलीला पाहतो. ती उत्तम स्टार होऊ शकते हे त्याला कळतं. तसं घडतंही.. पण पुढे दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीचा आलेख ढासळू लागतो ही टकागज के फूल’ची थोडक्यात कथा. चित्रपट लौकिकार्थाने तेव्हा चालला नाही, समीक्षकांनी तर झोडपला होता पण आज ‘क्लासिक्स’ सिनेमांमध्ये ‘कागज के फूल’ चित्रपटाचा उल्लेख आवर्जून केला जातो. अगदी तशीच गोष्ट आहे गुरु दत्त यांच्या ‘प्यासा’ची.
प्यासा चित्रपट हा आजही एक क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो
‘प्यासा’ सिनेमामध्ये गुरुदत्त, माला सिन्हा आणि वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गुरु दत्त आणि माला सिन्हा यांचं प्रेम असतं. मूळचा कवी असलेला विजय (गुरुदत्त) मीना (माला सिन्हा) या दोघांचं प्रेम अपयशी ठरतं. कारण विजयच्या भावनांपेक्षा मीनाला पैसा महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर विजय उद्विग्न होतो. त्याच्या आयुष्यात गुलाबो ( वहिदा रहमान ) येते. विजय कवी असल्याने त्याला रुढार्थाने प्रसिद्धी, पैसा हे सगळं कमवता येत नाही. पण एक कवी त्याच्या लेखणीतून शब्दांची ताकद कशी दाखवतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्यासा सिनेमा. या चित्रपटात विजय लग्न झालेल्या मीनाच्या घरी जातो. त्यावेळी त्याला पाहून ती चपापते. एकच प्रश्न विचारते “कैसे हो विजय?”, त्यावर विजय म्हणतो, “जिंदा हूँ” इतका साधा संवादही आपल्या मनात घर करुन जातो कारण तो गुरु दत्त यांनी एका तन्मयतेने म्हटला आहे. ‘प्यासा’ली गाणीही एकाहून एक सरस आहेत. जी आजही आपल्या मनात रुंजी घालत असतात. ‘हम आपकी आंखो से..’ ‘जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला’, ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हो..’ अशी एकाहून एक सरस गाणी या सिनेमात आहेत. गुरु दत्त आणि दिलीप कुमार यांचा या चित्रपटाबाबतचा एक किस्साही प्रसिद्ध आहे.

दिलीप कुमारचा अहंकार आणि प्यासा करण्याचं गुरुदत्त यांनीच ठरवलं
गुरु दत्त यांनी ‘प्यासा’ चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरवलं तेव्हा त्यात ते नायक नव्हते. त्यांच्या मनात दिलीप कुमार यांनी हा चित्रपट करावा असं होतं. दिलीप कुमार यांच्या नावाची त्या काळात चलती होती. एवढंच नाही मी तुझ्याबरोबर सिनेमा करणार आहे असं वचनही दिलीप कुमार यांनी गुरु दत्त यांना दिलं होतं. त्यामुळे गुरु दत्त जेव्हा दिली कुमार यांच्याकडे ‘प्यासा’ चित्रपट घेऊन गेले होते. मात्र दिलीप कुमार यांनी तो चित्रपट आपल्या अहंकारामुळे नाकारला. मी आत्ताच ‘देवदास’ हा चित्रपट केला आहे त्यामुळे मी ‘प्यासा’ सिनेमा करणार नाही असं म्हणत दिलीप कुमार यांनी ‘प्यासा ‘ चित्रपट नाकारला. ज्यामुळे गुरुदत्त चांगलेच चिडले आणि त्यातून ते म्हणाले मी तुम्हाला माझा चित्रपट विकायला आलो नाही तर साईन करायला आलो होतो. पण दिलीप कुमार यांनी चित्रपट नाकारल्याने चिडलेल्या गुरु दत्त यांनी स्वतःच तो चित्रपट करायचं ठरवलं ज्यामुळे ‘प्यासा’ सारखा अजरामर चित्रपट दिलीप कुमार यांच्या हातून निसटला.
नर्गिस आणि मधुबाला दोघींना करायचा होता प्यासा चित्रपट
नसरीन मुन्नी कबीर यांच्या ‘कनवर्सेशन विथ वहीदा रहमान’ या पुस्तकातील उल्लेखानुसार नर्गिस आणि मधुबाला दोघींनाही ‘प्यासा’ चित्रपट करायचा होता. पण त्या दोघींपैकी कुणालाही ‘मीना’ची भूमिका करायची नव्हती. त्या दोघीही ‘गुलाबो’ करण्यासाठी उत्सुक होत्या. मीनाची भूमिका चित्रपटात माला सिन्हा यांनी केली आहे तर गुलाबो वहिदा रहमान यांनी साकारली आहे.
गुरु दत्त यांनी लिव्हर ब्रदर्सच्या फॅक्टरीतही केलंय काम
गुरु दत्त यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे लिव्हर ब्रदर्सच्या फॅक्टरीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केलं. पण १९४४ मध्ये ते त्यांच्या घरी मुंबईत परतले. त्यांनी त्यानंतर मग प्रभात या फिल्म कंपनीत काम केलं. तिथे त्यांची भेट व्ही. शांताराम यांच्याशी झाली. कलामंदिर या नावाचा स्टुडिओ व्ही शांताराम चालवत होते. याच ठिकाणी गुरुदत्त यांची भेट देवानंद आणि अभिनेते रहमान यांच्याशी झाली. या तिघांची मैत्री खूप चांगली होती. १९४७ नंतर गुरुदत्त मुंबईत राहात होते पण त्यांचयाकडे काम नव्हतं. त्यावेळी इलेस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया साठी आणि एका स्थानिक साप्ताहिकासाठी कथा लिहिण्यास सुरुवात केली. ज्यामुळे गुरु दत्त ‘द गुरु दत्त’ झाले.
गुरू दत्त यांच्यात आणि पत्नीमध्ये खूप वाद सुरु होते
गुरू दत्त आणि त्यांच्या पत्नी गीता दत्त यांच्यात तेव्हा प्रचंड वाद सुरू होते. त्यांचं नातं मोडण्याच्या टप्प्यावर होतं. सततच्या भांडणांमुळे दोघांमध्ये अंतर वाढत होतं. ९ ऑक्टोबर १९६४ च्या रात्री गुरुदत्त यांनी पत्नी गीताला फोन करून मुलांना भेटण्याची विनंती केली, पण रात्रीच्या वेळेमुळे तिने मुलांना पाठवलं नाही. या फोन कॉलदरम्यान दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि संतप्त झालेल्या गुरू दत्तने फोनवर एक धक्कादायक वाक्य उच्चारलं, “जर मला मुलांना पाहता आलं नाही, तर तू माझं प्रेत पाहशील!” गुरु दत्त यांना दारुचं व्यसन लागलं होतं, तसंच प्रचंड नैराश्यामुळे ते कुटुंबापासूनही दुरावले आणि हळूहळू त्यांनी स्वतःला संपवायला सुरुवात केली. आज गुरु दत्त आपल्यात नाही मात्र त्यांच्या ज्या चित्रपटाला समीक्षकांनी सर्वात जास्त नावं ठेवली आज त्याच कागज के फूल चित्रपटाला प्रेक्षकांनी क्लासिकचा दर्जा दिला आहे.

नैराशाच्या गर्तेत जात केला आयुष्याचा शेवट
अभिनेता, दिग्दर्शक, कथा, पटकथा लेखक म्हणून गुरुदत्त यांची कारकीर्द फारच अल्प म्हणावी अशीच ठरली. कारण वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं. गुरुदत्त मुंबईतल्या पेडर रोड या ठिकाणी राहायचे. १० ऑक्टोबर १९६४ या दिवशी सकाळी त्यांच्या शयनगृहात त्यांचा मृतदेह सापडला. गुरुदत्त यांनी मृत्यूपूर्वी भरपूर दारु प्यायली होती आणि त्यामध्ये त्यांनी झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. गुरुदत्त यांनी या घटनेच्या आधीही दोनदा जीव देण्याचा प्रयत्न केला होता जो अपयशी ठरला होता. गुरु दत्त आज असते तर १०० वर्षांचे असते. पण वयाच्या ३९ व्या वर्षीच एका हरहुन्नरी आणि मनस्वी कलावंताने नैराश्याच्या गर्तेत जात स्वतःला संपवलं. त्यांच्या चित्रपटांचा ठसा मात्र ते मागे ठेवून गेले आहेत. त्यांची कारकीर्द अजरामर होती, आहे आणि यापुढेही राहिल यात शंका नाही.