अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते गुरु दत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला होता. १९६४ मध्ये ३९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. खूप कमी वयात गुरु दत्त यांनी आयुष्य संपवले होते. त्यांच्या मृत्यूबद्दल बरेच वेगवेगळे दावे केले गेले. पण त्याच्याबद्दल चित्रपट लेखक अबरार अल्वी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं. त्यात गुरु दत्त यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटलंय.
अबरार अल्वी यांनी आपल्या ‘टेन इयर्स विथ गुरु दत्त’ नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. गुरु दत्त नशेत होते आणि त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं होतं, त्यामुळे ते नैराश्यात होते. ते पत्नी गीता दत्त व मुलीपासून वेगळे झाले होते. वहीदा रहमानमुळे ते वेगळे झाले होते, असं म्हटलं जातं. वहीदा व गुरु दत्त यांच्या प्रेमाच्या चर्चा होत्या, त्यामुळे गीता मुलीबरोबर वेगळ्या राहू लागल्या. त्या त्यांना मुलीला भेटू देत नव्हत्या. पुस्तकातील उल्लेखानुसार, “मुलीचं तोंड पाहू दिलं नाही तर तू माझं पार्थिव पाहशील,” असं गुरु दत्त त्यांच्या पत्नीला म्हणाले होते.
अबरार अल्वी यांनी लिहिलंय की, ज्या दिवशी सकाळी गुरू दत्त यांचा मृतदेह आढळला, त्याच्या आदल्या रात्री ते खूप दारू प्यायले होते. त्यांनीही कितीही दारू प्यायले तरी ते नियंत्रणाबाहेर जायचे नाही, त्या रात्रीही ते १ वाजता झोपायला गेले होते. त्यावेळी अबरार काहीतरी लिहीत होते. गुरु दत्त पहिल्यांदाच अबरार यांनी लिहिलेलं न वाचता गेले होते, मग अबरार घरी निघून गेले. गुरु दत्त रात्री ३ वाजता उठले आणि त्यांनी असिस्टंटला अबरारबद्दल विचारलं. त्यानंतर ते पुन्हा दारू प्यायले, असिस्टंटने रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही.
गुरु दत्त यांनी केलेली आत्महत्या
गुरु दत्त नंतर आपल्या खोलीत गेले, सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. अल्वी म्हणाले होते की खोलीचे दार तोडून गुरु दत्त यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. गुरु दत्त यांच्या खोलीत एक बाटली आढळली होती, त्यावरून त्यांनी आत्महत्या केली, असं म्हटलं गेलं. अल्वी यांनी पुस्तकात गुरु दत्त यांच्याबद्दल लिहिलंय, ‘साकी से गिला था तुम्हें, मैखाने से शिकवा अब जहर से भी प्यास बुझाता नहीं कोई.’
गुरु दत्त यांनी मृत्यूआधी राज कपूर यांना केला होता फोन
गुरु दत्त यांनी आत्महत्येच्या रात्री शेवटचा फोन राज कपूर यांना केला होता आणि त्यांना घरी बोलावलं होतं. पण खूप रात्र झाली आहे, मी उद्या भेटायला येतो असं म्हणत राज कपूर यांनी नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी मात्र गुरु दत्त यांच्या निधनाची बातमी आली होती.