सावळा रंग, टपोरे डोळे, धारदार आवाज अन् अप्रतिम अभिनय.. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक यांनी त्या चित्रपटात लक्ष वेधून घेतलं होतं. खरं तर ‘खिचडी’मध्ये हंसा हे विनोदी पात्र साकारणाऱ्या याच त्या सुप्रिया आहे, याचाही विसर मला हा चित्रपट पाहताना पडला होता. एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली की त्याला त्याच धाटणीच्या भूमिका मिळतात, असं अनेक कलाकार म्हणतात. पण सुप्रिया पाठक त्याला अपवाद आहेत. त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक जॉनरच्या चित्रपटात तितकाच ताकदीचा अभिनय केला आहे. आज त्यांचा ६३ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडं जाणून घेऊयात.

सुप्रिया पाठक यांचं बालपण

सुप्रियांचा जन्म ७ जानेवारी १९६१ रोजी दिना पाठक व बलदेव पाठक यांच्या घरी झाला. काठियावाडी गुजराती थिएटर कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेत्री दिना पाठक त्यांच्या आई तर त्यांचे वडील बलदेव पाठक पंजाबी होते. ते राजेश खन्ना आणि दिलीप कुमार या स्टार्सचे ड्रेसमेकर होते. त्यांना एक मोठी बहीण आहे. त्यांचं नाव रत्ना पाठक, त्याही दिग्गज अभिनेत्री आहेत. सुप्रिया मुंबईतील दादरमध्ये पारसी कॉलनीत वाढल्या. त्यांनी जे.बी. वाच्छा हायस्कूलमधून शिक्षण घेतलं. तसेच नालंदा नृत्य संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये विशेष प्राविण्य मिळवून फाइन आर्टमध्ये पदवी प्राप्त केली.

Tabu Birthday Special: तब्बू – अनवट वाटेवरची वलयांकित नायिका

सुप्रिया यांचा चित्रपटांमध्ये प्रवेश

सुप्रियांनी त्यांच्या आईच्या दिग्दर्शनाखालील ‘मैना गुर्जरी’ नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर दिनेश ठाकूर यांच्यासह ‘बिवियों का मदरसा’ नावाचे एक नाटक केले. पृथ्वी थिएटरमध्ये या नाटकात शशी कपूर यांच्या दिवंगत पत्नी जेनिफर केंडल सुप्रियांना पाहिल्यावर त्यांची ‘कलयुग’ (१९८१) साठी शिफारस केली. यातील सुभद्राच्या भूमिकेमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘विजेता’ (१९८२), ‘बाजार’ (१९८२), ‘मासूम’ (१९८३) आणि ‘मिर्च मसाला’ (१९८५) मध्ये काम केलं. १९८८ मध्ये त्यांनी ‘द बंगाली नाईट’ या फ्रेंच चित्रपटात तिने काम केले होते. नंतर त्यांनी १९८९ साली ‘राख’मध्ये अभिनय केला होता. याशिवाय त्यांनी ‘बा बहू और बेबी’, ‘खिचडी’, ‘एक मेहेल सपनों का’ अशा मालिकांमध्येही काम केलं.

काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी ‘सरकार’, ‘सरकार राज’, ‘दिल्ली 6’, ‘वेकअप सिड’, ‘खिचडी: द मूव्ही’, ‘मौसम’, ‘ऑल इज वेल’, ‘द बिग बूल’, ‘मिमी’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘खिचडी 2: मिशन पंठूकिस्तान’ या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखविली.

पहिलं लग्न मोडलं, पंकज कपूर यांच्याशी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

२२ व्या वर्षी सुप्रिया पाठक यांनी लग्न केलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या एका वर्षातच हे जोडपं वेगळं झालं. १९८६ मध्ये ‘अगला मौसम’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्या पंकज कपूर यांना भेटल्या. दोन वर्ष नात्यात राहिल्यानंतर त्यांनी १९८८ साली दुसरं लग्न केलं. ते एक मुलगी आणि एका मुलाचे पालक आहेत.

४ हजारांसाठी राष्ट्रपतींसमोर लालकृष्ण अडवाणींशी भांडलेले विधू विनोद चोप्रा; संतापलेले अडवाणी म्हणालेले, “तुझ्या वडिलांना…”

सुप्रिया व पंकज यांची लव्ह स्टोरी

ट्विंकल खन्नाच्या यूट्यूब चॅट शो ‘द आयकॉन्स’मध्ये सुप्रियांनी पंकज यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीबद्दल सांगितलं होतं. सुप्रिया म्हणाल्या, “आम्ही एकत्र एक चित्रपट करत होतो आणि तो चित्रपट कदाचित फक्त आमच्या भेटीसाठी बनवला होता, कारण तो कधीच प्रदर्शित झाला नाही. आम्हा दोघांची बरीच मोठी पार्श्वभूमी होती. पण चित्रपट संपेपर्यंत आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. नंतर आम्ही आपापल्या मार्गाने गेलो. मग आम्ही एकत्र मुंबईत परतलो. पण तो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.”

सुप्रियांच्या लग्नाला आईचा होता विरोध

सुप्रियांनी या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांची आई दिवंगत दिना पाठक यांच्यासह अनेकांना त्यांचं पंकजबरोबरचं नातं मान्य नव्हतं. “प्रत्येकाने प्रयत्न केला पण मी कोणाचंही ऐकलं नाही. मी माझं मन बनवलं होतं. माझ्या आईने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत अगदी मला दोन मुलं झाल्यानंतरही माझं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. ‘तो तुला सोडून जाईल’ असं ती म्हणत राहिली. इतकी वर्षे झाली, तरीही ती ‘तुझी चूक झाली’ असं म्हणत राहिली. मला वाटतं रत्ना दीदींनी मला पाठिंबा दिला,” असं सुप्रिया म्हणाल्या होत्या.

‘बाजीराव मस्तानी’ भयंकर चित्रपट आहे, असं पेशव्यांच्या वंशजांना का वाटतं? जाणून घ्या

सुप्रिया पाठक यांचं शाहीद कपूरशी कसं आहे नातं?

सुप्रिया पाठक या शाहीद कपूरचे वडील पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. तो पंकज कपूर व निलीमा अझीज यांचा मुलगा आहे. सुप्रियाने शाहिदला जेमतेम सहा वर्षांचा असताना पहिल्यांदा भेटल्याची आठवणही या मुलाखतीत सांगितली होती. “मी शाहिदला भेटले तेव्हा तो अवघ्या ६ वर्षांचा होता. माझ्यासाठी, तो मी पाहिलेला सर्वात गोंडस मुलगा होता. तो खूप सुंदर मुलगा होता. आम्ही एकमेकांना विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया कधीच दिल्या नाहीत. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही एकमेकांना आवडलो आणि आजपर्यंत आम्ही तसंच वागतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुप्रिया पाठक व शाहीद कपूर यांचं नातं खूप चांगलं आहे. ते अनेकदा भेटत असतात. सुप्रिया यांचं मीरा राजपूतशी पण छान जमतं. जेव्हा ते कोणत्याही कार्यक्रमात भेटतात, तेव्हा मीरा त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असते.