घरी चित्रपटाशी संबंधित कुणीही नाही, मूळ गाव मुंबानगरीपासून हजारो किलोमीटर दूर हिमाचल प्रदेशात, अल्फा मेल अर्थात पौरुष अवतारी प्रतिमा नाही, सिक्स पॅक अॅब्स नाहीत. चित्तथरारक स्टंट केल्यानंतर ललनांच्या गराड्यात वगैरेही नाही. हिंदी मालिका आणि टीव्ही सृष्टीच्या हिरोच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देत पडद्यावर आम आदमी साकारुन त्यालाच नायकत्व देणाऱ्या विक्रांतचा आज वाढदिवस. टीव्ही मालिकांमध्ये काम करू लागल्यानंतर मंडळी तिथेच स्थिरावतात. पण विक्रांतने टीव्ही ते चित्रपट असं स्थित्यंतर केलं. सुरुवातीला पदरी पडलेल्या छोट्या भूमिका चोख निभावत विक्रांतने वाटचाल सुरू ठेवली. 12th fail निमित्ताने विक्रांतला हिरो करणारी कहाणी पडद्यावर आली. चंबळसारख्या दुर्गम भागातून सुरुवात करून थेट प्रशासकीय अधिकारी झालेल्या मनोज शर्मा यांची कारकीर्द विक्रांतने सुरेख साकारली. याचा प्रत्यय चाहत्यांच्या प्रतिक्रिया, पुरस्कार आणि सोशल मीडियावर वाढते फॉलोअर्स यातून सिद्ध होताना दिसत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रांतच्या सफरीचा घेतलेला धांडोळा.

विक्रांतचं बालपण

विक्रांतचं कुटुंब मूळचं हिमाचल प्रदेशमधील शिमल्याचं. त्याच्या वडिलांचं नाव जॉली आणि आईचं नाव आमना आहे. त्याला मोईन नावाचा मोठा भाऊ आहे. त्याच्या वडिलांचं कुटुंब ख्रिश्चन धर्म पाळतं, तर त्याच्या आईचं कुटुंब शीख आहे. विक्रांतच्या आई-बाबांनी पळून जाऊन लग्न केलं होतं, नंतर ते काही काळ विदर्भातील नागभीड इथं राहत होते, तिथून मुंबईत आले.


विक्रांतचं शिक्षण अन् अभिनयक्षेत्रात पदार्पण

विक्रांतचं शालेय शिक्षण वर्सोवा येथील सेंट अँथनी हायस्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर मुंबईतील वांद्रे येथील आर.डी. नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून त्याने पुढील शिक्षण पूर्ण केलं. विक्रांत कंटेम्प्ररी व जॅझ डान्स शिकला आहे. त्याने श्यामक डावरबरोबर काम केलं आहे. त्याने अनेक शोमध्ये कोरिओग्राफी केली होती. २००८ मध्ये ‘धरम वीर’ मालिकेत राजकुमार धरमची भूमिका करून त्याने अभिनयाला सुरुवात केली.

‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने का सोडले मालिकाविश्व? म्हणाला, “स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या…”

टीव्ही मालिकांमध्ये काम

२००९ ते २०१० या काळात विक्रांत प्रचंड गाजलेल्या ‘बालिका वधू’ मालिकेत झळकला. यात त्याने अभिनेत्री विभा आनंदच्या पतीची भूमिका केली होती. त्यानंतर ‘बाबा ऐसा वर धुंडो’ मालिकेत त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. २०१३ साली त्याने ‘कुबूल है’ मालिकेत अयान अहमद खानची भूमिका साकारली. मग त्याने ‘व्ही द सीरियल’ आणि ‘ये है आशिकी’ शो होस्ट केले. त्याशिवाय तो ‘अजब गजब घर जमाई’ मध्येही झळकला.

‘लूटेरा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण

विक्रांतने रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याबरोबर ‘लुटेरा’ (२०१३) चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केलं. यात त्याने रणवीरच्या मित्राची भूमिका साकारली होती. मग तो ‘दिल धडकने दो’ मध्ये झळकला. मग ‘अ डेथ इन द गुंज’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘ब्रोकन बट ब्युटिफूल’, ‘क्रिमिनल जस्टीस’, लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’, ‘मेड इन हेव्हन’ असे सिनेमे व सीरिजमध्ये दिसला. नंतर त्याला दीपिका पदुकोणबरोबर ‘छपाक’ मध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. दीपिकाच्या पतीच्या भूमिकेत विक्रांत भाव खाऊन गेला होता. चित्रपट फ्लॉप झाला, पण विक्रांतचं खूप कौतुक झालं. या चित्रपटात दीपिकापेक्षा खूप कमी मानधन मिळालं होतं, असं विक्रांतने सांगितलं होतं. टीव्हीपासून सुरुवात करणाऱ्या विक्रांतने हळूहळू बॉलीवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक व कलाकारांबरोबर काम केलं. ‘हसीन दिलरुबा’ मध्ये त्याने तापसी पन्नूच्या साध्याभोळ्या पतीची भूमिका केली होती. तापसी अन् हर्षवर्धनच्या भूमिका दमदार होत्या, तर त्यापुढे विक्रांतची भूमिका खूपच साधी होती. पण या चित्रपटातही तो भाव खाऊन गेला होता. ‘१४ फेरे’, ‘फॉरेन्सिक’, ‘गॅसलाइट’, ‘मुंबईकर’ असे अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमे विक्रांतने केले.

12th फेलचं यश

२०२३ हे वर्ष विक्रांतसाठी खास ठरलं ते 12th फेल चित्रपटाच्या यशामुळे. एकीकडे बड्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळत होते, तर दुसरीकडे काही बिग बजेट कमर्शिअल चित्रपटांची चलती होती. याच दरम्यान २७ ऑक्टोबर रोजी 12th फेल बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाचं दिग्दर्शन विधू विनोद चोप्रांनी केलं होतं. दिग्दर्शक नावाजलेला असला तरी स्टारकास्ट मात्र नावाजलेली नव्हती की त्यांच्यासाठी प्रेक्षक सिनेमा पाहायला गर्दी करतील. पण विक्रांतच्या अभिनयाने प्रेक्षकांना थिएटर्समध्ये येण्यास भाग पाडलं. आयपीएस मनोजकुमार शर्मांचा प्रवास दाखवताना त्याने प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं.

प्रेक्षकांनीच हा सिनेमा उचलून धरला आणि तब्बल ८० दिवस तो थिएटर्समध्ये चालला. चोप्रांनी अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती केलेल्या या सिनेमानं ‘टायगर ३’ ‘अॅनिमल’, ‘सॅम बहादूर,’ ‘डंकी’ अशा सुपरस्टार्सच्या चित्रपटांना टक्कर देत ६९.६४ कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर बॉलीवूडमधील कलाकारांनीही त्याच्या दमदार अभिनयासाठी विक्रांतचं कौतुक केलं.

इंडस्ट्रीतील सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान हे खान त्रिकुट मागे पडलं आहे. विक्रांत मॅसीप्रमाणेच आयुष्मान खुराना, राजकुमार राव असे कलाकार हिरो होऊ लागले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर हे अभिनेते सिनेइंडस्ट्री व प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करत आहेत. सिक्स पॅक अॅब्स, रंग-रुप, कौटुंबीक पार्श्वभूमी अशा गोष्टी आता मागे पडत आहेत, त्यामुळे स्टारडमची व्याख्याही बदलत आहे.

विक्रांत रोहित शर्माचा चाहता

विक्रांतला क्रिकेटची खूप आवड आहे. तो क्रिकेटपटू रोहित शर्माचा चाहता आहे. विक्रांतचा 12th फेल चित्रपट पाहून रोहितनेही त्याचं कौतुक केलं होतं. “मी मुंबईकर आहे. रोहित स्वतः डोंबिवलीचा आहे आणि तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मला रोहित खूप आवडतो. यावरून माझं मित्रांशी भांडणही होतं,” असं विक्रांत एका मुलाखतीत रोहितबद्दल म्हणाला होता.

विक्रांतचं वैयक्तिक आयुष्य

विक्रांतच्या पत्नीचं नाव शीतल ठाकूर आहे. दोघेही २०१५ पासून डेट करत होते, नंतर त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. या जोडप्याला ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगा झाला. त्यांनी मुलाचं नाव वरदान ठेवलं आहे.