धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौरशी झालं होतं. तरीही त्यांनी हेमा मालिनींशी प्रेमविवाह केला होता. दुसऱ्या लग्नानंतर धर्मेंद्र यांच्यावर टीका होत होती, तेव्हा प्रकाश कौर यांनी त्यांची बाजू घेतली होती. तसेच हेमा यांनीही लग्नानंतर कधीच पतीच्या घरात पाऊल ठेवलं नसल्याची कबुली दिली होती.
हेमा मालिनींनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलंय की त्या प्रकाश कौर यांना लग्नापूर्वी काही वेळा भेटल्या होत्या. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यावर मात्र कधीच त्यांच्याशी भेट झाली नाही. हेमा मालिनींनी लग्नानंतर कधीच धर्मेंद्र यांच्या जुहू येथील बंगल्यात पाय ठेवला नाही. हेमा व धर्मेंद्र यांचे बंगले थोड्याच अंतरावर आहेत.
कोणालाही त्रास द्यायचा नव्हता – हेमा मालिनी
हेमा मालिनी याबद्दल बोलताना म्हणाल्या, “मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केलं, त्याबद्दल मी आनंदी आहे. त्यांनी वडिलांची भूमिका बजावली, जसे कोणतेही वडील करतात.”
“मला याबद्दल वाईट वाटत नाही. मी माझ्या जगात आनंदी आहे. मला माझ्या दोन मुली आहेत आणि मी त्यांना योग्य पद्धतीने वाढवलंय. अर्थात, ते (धर्मेंद्र) नेहमीच आमच्यासाठी होते. कोणालाही त्यांच्या जोडीदारापासून दूर राहणे आवडत नाही, परंतु कधीकधी परिस्थिती अशी असते की ती स्वीकारावी लागते,” असं लेहरेनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या.
“मी काम करणारी महिला आहे, माझे आयुष्य मी कला व संस्कृतीसाठी समर्पित केले आहे. मला वाटतं की जर परिस्थिती यापेक्षा थोडी वेगळी असती तर मी आज जशी आहे तशी नसते. मी प्रकाश कौरबद्दल कधीच बोलले नसले तरी मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण आमचं आयुष्य लोकांसाठी नाही,” असं हेमा मालिनींनी म्हटलं होतं.
प्रकाश कौर पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाल्या होत्या?
धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यावर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती, पण प्रकाश कौर यांनी पतीची बाजू घेतली होती. “फक्त माझा नवराच का? कोणत्याही पुरुषाने माझ्यापेक्षा हेमाला पसंत केलं असतं. अर्धी इंडस्ट्री अशीच आहे, तरी माझ्या नवऱ्याला स्त्रीलंपट म्हणण्याची लोकांची हिंमत कशी होते? तो कदाचित सर्वात चांगला नवरा नसेल, पण तो माझ्याशी खूप चांगला वागतो. तो उत्तम बाबा आहे, त्याची मुलं त्याच्यावर खूप प्रेम करतात. तो कधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही,” असं १९८१ ला स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या.
प्रकाश कौर त्यावेळी हेमा मालिनींबद्दल व्यक्त झाल्या होत्या. “हेमा कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मी समजू शकते. तिलाही जगाचा, तिच्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा सामना करावा लागतो. पण जर मी हेमाच्या जागी असते तर तिने जे केलं ते मी केलं नसतं. एक महिला म्हणून, मी तिच्या भावना समजू शकते. पण एक पत्नी आणि आई म्हणून मला त्या मान्य नाहीत,” असं प्रकाश कौर यांनी म्हटलं होतं.