Hema Malini Reveals She Did Not Wanted To Play Basanti In Sholay : ‘शोले’ चित्रपट हा ९०च्या काळातील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि जया बच्चन या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी हेमा मालिनी यांनी आधी नकार दिला होता.

रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शोले’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘शोले’ चित्रपटात हेमा मालिनी यांनी बसंती ही भूमिका साकारलेली, जी त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक आहे. परंतु, या भूमिकेसाठी त्यांनी आधी नकार दिला होता. याबाबत त्यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना सांगितलं आहे.

‘शोले’ चित्रपटातील भूमिकेबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?

हेमा मालिनी मुलाखतीत म्हणाल्या, “जेव्हा मला आधी या चित्रपटासाठी विचारणा झाली होती, तेव्हा मी यासाठी फार उत्सुक नव्हते. मी रमेश सिप्पी यांना विचारलंही होतं की, तुम्ही मला टांगेवालीच्या भूमिकेसाठी विचारत आहात याबद्दल तुम्ही ठाम आहात का? ही खूप छोटी भूमिका आहे. मी त्यांच्यासह त्यापूर्वी ‘अंदाज’ आणि ‘सीता और गीता’ चित्रपटात काम केलं होतं, ज्यामध्ये मी दुहेरी भूमिका साकारलेली.”

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, “त्यांनी मला सांगितलं की, या चित्रपटात इतर अनेक कलाकार आहेत, त्यातील तू एक भूमिका साकारत आहेस. त्यावर मी म्हटलं, पण ही खूप छोटी भूमिका आहे. मला त्यातून काही प्रेरणा मिळत नाही. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं की, भूमिका स्वीकार नाही तर तुला पश्चाताप होईल. मी तेच केलं आणि मला आनंद आहे की मी त्यांचं ऐकलं.”

हेमा मालिनी पुढे बसंती या भूमिकेबद्दल म्हणाल्या, “बसंतीची भूमिका साकारताना संवाद कसे बोलायचे याबाबत मी थोडी गोंधळात होते. तेव्हा जावेद अख्तर माझ्याबरोबर होते. त्यांनी मला कथा सांगितली आणि संवाद कसे बोलायचे हे सांगितलं. त्यांनी मला जे सांगितलं, मी तसंच केलं. लोक आजही मला भेटल्यानंतर ते संवाद बोलतात. मला त्यामुळे आनंद होतो. बसंतीची भूमिका इतकी लोकप्रियता मिळवेल याबाबत मला माहिती नव्हतं. मी आजही जेव्हा केव्हा स्टेजवर जाते, तेव्हा मला तोवर खाली उतरणं शक्य होतं नाही, जोवर मी बसंतीचा एखादा संवाद म्हणत नाही. आजही बसंतीची अशी क्रेझ आहे. बसंती ही खूप वेगळी भूमिका होती, ती मुलगी स्वावलंबी होती.”

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, “ती तिच्या स्वतःच्या अटींवर आयुष्य जगली. ती एकटीच होती, तरीही स्वतःची काळजी घेत होती, हेच तिच्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण होतं. आजही जेव्हा मी तिचा विचार करते, तेव्हा असं वाटतं की, खरंच आपण आज जसं म्हणतो तशी ‘आत्मनिर्भर’ होती. त्यामुळे एका अर्थानं ती तिच्या काळाच्या खूप पुढे होती आणि त्यावेळी मला हेही ठाऊक नव्हतं की हे कधीतरी इतकं महत्त्वाचं ठरेल.”

“मी काही कार्यक्रम पाहिलेत, जिथे बसंतीचा उल्लेख होतो किंवा तिचं उदाहरण दिलं जातं. पण, मी फारशी सोशल मीडियावर सक्रिय नसते. मी ऐकलंय की तिच्यावर खूप मीम्स आहेत आणि लोकांना तिचे संवाद खूप आवडतात.”