Hema Malini Talk’s About Sholey : अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन ही बॉलीवूडमधील दिग्गज नावं आहेत. या चार लोकप्रिय कलाकारांनी जेव्हा एका चित्रपटात काम केलं तेव्हा तो चित्रपट फक्त हिट ठरला नाही, तर पुढे पिढ्यान् पिढ्या त्याबद्दल चर्चा होत राहिली. विशेष बाब म्हणजे आजही त्याची क्रेझ कायम आहे. अर्थात, हा चित्रपट ‘शोले’ असून, आता हेमा मालिनी यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेमा मालिनी ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अभिनय व सौंदर्याद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली. त्या फक्त अभिनयापुरतं मर्यादित न राहता, राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा सदस्य आहेत. अशातच आता त्यांनी ‘शोले’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेमा मालिनी यांची ‘शोले’बद्दल प्रतिक्रिया

‘एएनआय’शी संवाद साधताना त्यांनी याबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या, “चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद होतो. त्यावेळी काम करताना माहीत नव्हतं की, हा चित्रपट इतका हिट होणार आहे. ५० वर्षांनंतर तुम्ही मला संसदेत याबद्दल प्रश्न विचाराल याची मी कल्पना केली नव्हती. त्यावेळी तर मला मी संसदेत येईन हेही माहीत नव्हतं. तो काळ खूप वेगळा होता. तो चित्रपट तेव्हा बनला; पण दुसरा ‘शोले’ बनवणं कठीण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शोले’ चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला होता. येत्या १५ ऑगस्टला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं होतं. हा चित्रपट जरी ९० च्या काळातील सुपरहिट चित्रपट असला तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबद्दल सुरुवातीला नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि दोन आठवड्यांमध्ये तो बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नाही. परंतु, नंतर सकारात्मक मौखिक प्रसिद्धीमुळे हा चित्रपट चांगला चालला.

दरम्यान, हेमा मालिनी यांनी ९० च्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं होतं. हेमा मालिनी त्या काळातील प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांना ड्रीमगर्ल म्हणूनही संबोधलं जातं. आजही प्रेक्षकांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे.