सध्या सर्वत्र ‘हेरा फेरी ३’ची जोरदार चर्चा सुरू आहे. परेश रावल यांची ‘हेरा फेरी’च्या दोन्ही भागांमधील ‘बाबुराव आपटे’ ही भूमिका चांगलीच गाजली. पण ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागातून सर्वांचे आवडते बाबुराव म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी बाहेर पडल्याची घोषणा केली आहे. त्यांनी अचानक बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर अनेक चाहत्यांची निराशाच झाली आहे.
यानंतर अक्षय कुमारच्या निर्मित संस्थेकडून त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. या कायदेशीर नोटीसनंतर परेश रावल यांनी एक्सवर पोस्ट करत “माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य ते उत्तर पाठवले आहे. एकदा त्यांनी माझे उत्तर वाचले की, सर्व समस्या सुटतील.” असं म्हटलं. अशातच आता याप्रकरणी आता अभिनेता अक्षय कुमारने स्वत: त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘हाउसफुल्ल ५’च्या ट्रेलर लाँचला एका पत्रकाराने परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट मध्येच सोडल्याबद्दल लोक त्यांना मूर्ख म्हणत आहे असं म्हटलं. यावर अक्षयने पत्रकाराला मध्येच थांबवलं आणि म्हटलं, “माझ्या सह-कलाकाराला मुर्ख म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांच्याबरोबर गेली ३२ वर्ष काम करत आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि ते खूप कमाल अभिनेते आहेत. मी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो आहे.”
यापुढे अक्षय म्हणाला, “जे काही झालं आहे, त्याविषयी इथे बोलणं योग्य नाही. मी या मंचावर याविषयी बोलणार नाही. हा खूप गंभीर मुद्दा आहे. हे प्रकरण सध्या न्यायालय हाताळत आहे. त्यामुळे याबद्दल जे काही व्हायचं ते न्यायालयातच होईल. न्यायलय याबद्दलचा निर्णय देईल.” त्यामुळे ‘हेरा फेरी ३’ वरुन चाललेल्या वादावर अक्षयने मोजक्या शब्दांत त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने परेश रावल यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला आहे. परेश रावल यांनी करारावर स्वाक्षरी करूनही ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून बाहेर पडले आणि यामुळे निर्मात्यांचं आर्थिक नुकसान झालं, असा दावा अक्षय कुमारच्या निर्मिती संस्थेकडून करण्यात आला. त्यावर परेश रावल यांनीही कायदेशीर उत्तर पाठवलं आहे.
दरम्यान, ‘हेरा फेरी ३’ मधून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट पुन्हा प्रेक्षकांना हसवणार होतं. त्यामुळे चाहते मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल यांनी चित्रपटात काम करणार नसल्याचं जाहीर करताच अनेक चाहते नाराज झाले आहेत. अनेकांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.