Rangeela Movie : उर्मिला, जॅकी श्रॉफ, आमिर खान अशी तगडी स्टार कास्ट. ए. आर. रहमानचं संगीत, राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन अशा सगळी परफेक्ट भट्टी जमवत ‘रंगीला’ चित्रपट तयार करण्यात आला होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. याचं महत्त्वाचं कारण होतं उर्मिला मातोंडकरचा बिकिनी लूक. ‘तनहा तनहा’ आणि ‘हाय रामा ये क्या हुआ’ या गाण्यांमध्ये तिने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा त्या काळी ओलांडल्या होत्या. देमार पटांची चलती असताना आणि एकीकडे हम आपके हैं कौन आणि डीडीएलजे सारख्या कौटुंबिक चित्रपटांनी जागा निर्माण करण्यास सुरुवात केलेली असताना रंगीला हा रामूचा बोल्ड चित्रपट रिलिज झाला आणि संगीतकार अन्नू मलिकच्या भाषेत बॉक्स ऑफिसपे ‘आग लग गयी!’
रंगीला ठरला कल्ट क्लासिक
१९९५ हे असं वर्ष होतं ज्या वर्षी शाहरुख-काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, सलमान आणि शाहरुखचा ‘करण अर्जुन’, गोविंदाचा ‘कुली नंबर १’, संजय कपूर, माधुरीचा ‘राजा’, बॉबी देओल आणि ट्विंकल खन्नाचा ‘बरसात’ असे सगळे चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र ‘रंगीला’ने त्याची जागा नुसती बनवलीच नाही तर तो सिनेमा एक कल्ट क्लासिक ठरला. प्रेम त्रिकोण हे काही हिंदी चित्रपट सृष्टीला नवे नाहीत. मात्र रामूच्या कॅमेरातून टिपलेला हा प्रेम त्रिकोण पिटातल्या प्रेक्षकांपासून क्लास जपणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनाच भावला. याचं कारण सिनेमाची कथा तुमच्या आमच्यातल्या घरातली होती.
सिनेमाची कथा थोडक्यात काय?
मिली (उर्मिला मातोंडकर) नावाची एक मुलगी तिला मोठी अभिनेत्री होण्याचं स्वप्न आहे. तिचा मित्र मुन्ना (आमिर खान) हा तिच्या बरोबरच लहानाचा मोठा झालेला. त्याला तिचं स्वप्न ठाऊक आहे. शिवाय मनोमन तो तिच्यावर प्रेमही करतो. अशात मिलीच्या आयुष्यात एंट्री होते सुपरस्टार कमल कपूरची (जॅकी श्रॉफ). कमल हा मिलीला नाचाची प्रॅक्टीस करताना पाहतो. त्यानंतर तिच्या आयुष्याला नाट्यमय कलाटणी मिळते. एक्स्ट्रा म्हणून डान्स करणारी मिली थेट अभिनेत्री होते. सुरुवातीला येणारं दडपण, शुटिंग, मिलीबाबत कमलच्या मनात फुलणारं प्रेम या सगळ्या भावना रामूने हळूवारपणे टिपल्या आहेत. त्यामुळे चित्रपट आपल्याला एखादी कळी फुलते तसा उलगडत जातो. इकडे मुन्नाला या मिली आणि कमलची मैत्री खटकणं, त्यातून निर्माण होणारी असूया, मग त्याचं निघून जाणं. पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरला मुन्नाचं नसणं. मुन्ना मिलीच्या किती जवळचा आहे हे कमलला कळणं. मग त्याचा त्याग.. आणि सुखद शेवट अशी साधी सोपी प्रेमकहाणी व्हाया लव्ह ट्रँगल रामूने दिग्दर्शित केली होती. या चित्रपटातली गाणी ही चित्रपटाची अजून एक जमेची बाजू.

चित्रपटातली गाणी एकाहून एक सरस
रंगीला रे, हाय रामा ये क्या हुआ, यारो सुन लो जरा, क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्कील हाये, आई आई ऊ, तनहा-तनहा आणि प्यार ये जाने कैसा है अशा एकाहून एक गाण्यांची रेलचेल चित्रपटात होती. प्रेमकहाणी असल्याने आणि गाण्यांना खास रहमान टच असल्याने ही गाणी आजही म्हणजेच चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्यावरही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आशा भोसले यांनी गायलेल्या तनहा तनहा या गाण्यासाठी तर त्यांना पुरस्कारही मिळाला.

आमिरने सांगितलेली ‘रंगीला’ची खास आठवण
आमिरने एका मुलाखतीत रंगीला चित्रपटातील गाण्याच्या शुटिंगचा किस्सा सांगितला होता. “आई आई ऊ या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान मला आणि उर्मिलाला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता कारण या गाण्याचे बोल काय आहेत तेच आम्हाला नीट कळलं नव्हतं. त्यामुळे या गाण्याच्या चित्रीकरणात अडचणी आल्या.” शिवाय आमिरने या चित्रपटाची आठवण सांगितली ती म्हणजे अशी की रंगीला चित्रपटातला मुन्ना हा चित्रपटांची तिकिटं ब्लॅक करणारा असतो. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरने मित्रांचे कपडे मागून आणले होते. जुने वाटतील असे कपडे घालून त्याने टपोरी लूक केला होता.
रंगीलामुळे उर्मिला रातोरात सुपरस्टार
रंगीला या चित्रपटामुळे उर्मिला मातोंडकर रातोरात सुपरस्टार झाली. बोल्डनेसचा तडका या चित्रपटात अशा पद्धतीने दाखवण्यात आला होता की उर्मिला स्टार झाली नसती तरच नवल वाटलं असतं. त्यावरुन बराच वादंगही झाला होता. पण प्रेक्षकांनी समीक्षकांच्या टीकेला न जुमानता तिकिटबारीवर गर्दी केली ती उर्मिलाचा बोल्ड अवतार पाहण्यासाठी. हिंदी चित्रपटसृष्टीला तोपर्यंत इतका बोल्डनेस सहन करायची सवय नसणार हे उघड होतं. त्यामुळे समीक्षकांनी रंगीलावर टीका केली होती. पण प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरुन यश मिळवून दिलं. पुढे ही टीका विरुन गेली आणि लोकांना उर्मिला कायमची लक्षात राहिली. ‘रंगीला गर्ल’ असा किताबही तिला लोकांनी देऊन टाकला होता. तर मनिष मल्होत्राने पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्रीसाठी कपडे डिझाईन केले होते. यातले उर्मिलाचे वेगवेगळे ड्रेसेस हे मनिष मल्होत्राने ठरवले होते. आजच्या काळात मनिष मल्होत्रा हा टॉपचा ड्रेस डिझायनर आहे.

रंगीला चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होतं?
रंगीलाचं त्या काळातलं बॉक्स ऑफिस कलेक्शन ३३ कोटींच्या घरात होतं. चित्रपटाचं बजेट ५ कोटी होतं. त्यापेक्षा साधारण पाचपट पैसे या चित्रपटाने कमावले होते. १९९५ च्या हायेस्ट ग्रॉसिंग चित्रपटांच्या यादीत रंगीला जाऊन बसला तो याच कारणामुळे. या चित्रपटात गुलशन ग्रोवर, रिमा लागू, अच्युत पोतदार, अवतार गिल, शेफाली शाह यांच्याही भूमिका होत्या.
‘रंगीला’ला त्या वर्षीचे सात फिल्मफेअर
रंगीला चित्रपटाला त्या वर्षीचे सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. जॅकी श्रॉफ बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, अहमद खान बेस्ट कोरिओग्राफी, मनिष मल्होत्रा बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन, राम गोपाल वर्माला बेस्ट कहाणीसाठी, तर ए आर रहमानला बेस्ट म्युझिकसाठी फिल्मफेअर मिळालं. तनहा तनहा या गाण्यासाठी आशा भोसलेंना बेस्ट गायिकेचा विशेष फिल्मफेअर मिळाला.
रंगीला हे नाव आमिरच्या मुन्नावरुन ठेवण्यात आलं होतं, पण हिट झाली उर्मिला
रंगीला हे नाव खरंतर आमिर खानच्या मुन्ना या भूमिकेवर आधारित होतं. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चर्चा झाली ती उर्मिलाची. आमिर सुपरस्टार झाला होताच. पण उर्मिला रातोरात सुपरस्टार झाली. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटात आधी श्रीदेवीला आणि नंतर मनिषा कोईरालाला घेण्याचा विचार केला होता. पण हा चित्रपट उर्मिला मातोंडकरला मिळाला आणि तिने संधीचं सोनं केलं. अशा या खास चित्रपटाला आणि चिरकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेल्या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. राम गोपाल वर्मा जेव्हा फॉर्मात होता तेव्हा आपण लव्हस्टोरीही किती छान पद्धतीने दाखवू शकतो हे त्याने दाखवून दिलं होतं. रंगीला पाहिलेली पिढी आता चाळीशी, पन्नाशी किंवा साठीत आहे. पण रंगीलातली उर्मिला आठवली की त्यांनाही हायसं वाटतं यात काही शंका नाही.