Rakesh Roshan Hospitalised : बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते व लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांना १६ जुलै रोजी तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यानंतर राकेश रोशन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

राकेश रोशन यांना कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळुहळू सुधारणा झाल्यावर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

राकेश रोशन यांची मुलगी व हृतिकची बहीण सुनैना रोशनने यासंदर्भात ‘अमर उजाला’शी संवाद साधत वडिलांची हेल्थ अपडेट शेअर केली आहे. ती म्हणाली, “हो पप्पांच्या मानेची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पण, आता ते पूर्णपणे ठीक आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. त्यांना डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.”

राकेश रोशन यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर रुग्णालयात उपस्थित आहे आणि त्यांची काळजी घेत आहे. त्यांच्या पत्नी, हृतिक रोशन, सुनैना रोशन, हृतिकची प्रेयसी सबा आझाद हे सगळेजण सध्या रुग्णालयात उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर तो लवकरच यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील ‘वॉर २’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासह कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हृतिक जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंट करताना दिसेल.