बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाचा दिल्लीतील निझामुद्दीन भागात खून झाला. आसिफ कुरेशी असं हुमाच्या चुलत भावाचं नाव आहे. गुरुवारी (७ ऑगस्ट) रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आसिफच्या घरासमोर स्कूटर ठेवण्यात आली होती. स्कूटरच्या पार्किंगमुळे झालेल्या वादातून आरोपींनी आसिफचा खून केला.
हुमा कुरेशीचे वडील सलीम कुरेशी यांनी या धक्कादायक घटनेबद्दल माहिती दिली. “दोन जणांनी घरासमोर एक स्कूटर पार्क केली होती. आसिफने त्यांना ती बाजूला हटवण्यास सांगितली. तसेच गेटवर स्कूटर पार्क करू नका असं सांगितलं. यामुळे आसिफ व दोन्ही आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि मग त्यांनी मारहाण केली. त्या दोघांनी मिळून माझ्या पुतण्याचा खून केला,” असं सलीम कुरेशी म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलंय.
मृत ३८ वर्षीय आसिफ कुरेशीवर रात्री ११ वाजता जंगपुरा भोगल मार्केट लेनजवळ धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. आसिफला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आसिफ कुरेशीच्या पत्नीने काय सांगितलं?
मृत आसिफ कुरेशीची पत्नी शाहीन हिने आरोप केला आहे की आसिफची हत्या पूर्वनियोजित होती. यापूर्वीही याच लोकांनी आसिफवर हल्ला केला होता, असा दावाही तिने केला. “आमच्या गेटसमोर एका तरुणाने स्कूटर उभी केली होती, त्यामुळे वाद सुरू झाला. माझ्या पतीने त्याला स्कूटर दुसरीकडे हलवण्याची विनंती केली, पण तो तरुण शिवीगाळ करू लागला. तो म्हणाला की तो स्कूटर तिथून हलवेल, पण त्याऐवजी तो आणखी काही लोकांना घेऊन परत आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला,” असं शाहीन म्हणाली.
“आरोपी उज्ज्वलने अचानक आसिफच्या छातीवर हल्ला केला. तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला दूर ढकललं. यानंतर त्या आरोपीबरोबरच्या काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला शिवीगाळ केली,” असं शाहीनने सांगितलं.
आसिफच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गौतम व उज्ज्वल या दोन भावांना अटक केली आहे. उज्ज्वलने आधी आसिफवर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आसिफच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आसिफ आणि आरोपीमध्ये पार्किंगवरून यापूर्वीही वाद झाला होता, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.