स्टार क्रिकेटर विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं. विराटचे चाहते या निर्णयामुळे दुखावले आहेत. अनेकांना विराटनं अजून काही वर्षं क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये खेळावं, असं वाटत आहे. परंतु, विराट त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतं. विराटनं १२ मे रोजी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत ही माहिती दिली.

विराट कोहलीनं कसोटीमधील निवृती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यासाठी पोस्ट केल्या. विराटच्या अनुपस्थितीत आता कसोटी क्रिकेटचे सामने बघताना पूर्वीसारखा जोश, मजा पाहायला मिळणार नसल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. विराटनं घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक कलाकार मंडळींनीही त्याच्यासाठी पोस्ट केल्या होत्या. अशातच आता बॉलीवूडमधील ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनीदेखील विराटसाठी खास पोस्ट केली आहे.

जावेद अख्तर एक्सवर (पूर्वीचे नाव ट्विटरवर) ट्वीट करीत म्हणाले, “विराट जाणकार आहे; पण या महान खेळाडूचा चाहता म्हणून त्यानं घेतलेल्या निवृतीच्या निर्णयामुळे मी निराश झालो आहे. मला असं वाटतं की, विराट अजून काही काळ किकेट खेळू शकतो. त्यामुळे मी त्याला विनंती करतो की, त्यानं या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करावा.”

भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीनं कसोटीमधून निवृत्ती घेतल्याचा अनेकांना धक्का बसला आहे. विराट कोहलीचा कसोटीमधील रेकॉर्ड कायमच कमालीचा राहिला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरुद्ध सामन्यांमध्ये तर कोहलीनं कायमच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पण, आता कसोटीमध्ये विराट यापुढे खेळताना दिसणार नाहीये.

विराटच्या या निर्णयानंतर केवळ क्रीडाविश्वातूनच नाही, तर कलाविश्वातूनही अनेक जण त्याच्या निवृतीच्या निर्णयानं दुखावले असल्याचं दिसतं. बॉलीवूड अभिनेता विकी कौशल, रणवीर सिंह, नेहा धुपिया यांसारख्या अनेक कलाकारांनी याबाबत पोस्ट केल्या होत्या. रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनंदेखील कसोटीमधून निवृती जाहीर केल्यानं सध्या क्रिकेटप्रेमी दुखावले असल्याचंही पाहायला मिळतं.

दरम्यान, जावेद अख्तर यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर ते अनेकदा त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतात. सोशल मीडियावर पोस्ट करीत ते समाजात घडणाऱ्या घटनांबाबत बोलताना दिसतात. त्यामुळे ते सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. यापूर्वी त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दलही त्यांचं मत मांडलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.