Indian Models Call Out Exploitation In Fashion Industry: मॉडेल रोशनी शर्माने नुकतीच इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने मॉडेल्सना किती मानधन मिळाले पाहिजे, यावर परखडपणे तिचे मत व्यक्त केले आहे. तसेच, मॉडेल्सना ज्या प्रकारची वागणूक मिळते, त्याबद्दल निराशा व्यक्त केली.
पूल मॉडेल्सना दर दिवशी ४०,००० मानधन मिळाले पाहिजे
रोशनी शर्माने लिहिले, ” फॅशन वीकमध्ये पूल मॉडेल्सना दर दिवशी ४०,००० मानधन मिळाले पाहिजे. ज्यामध्ये प्रवास आणि राहण्याचा खर्च समाविष्ट असायला हवा. जर तुम्हाला मॉडेलिंगचा अनुभव असेल, तर तुम्ही तुम्हाला जे मानधन मिळायला पाहिजे, ते समोरच्याला स्पष्टपणे सांगितले पाहिजे. जर तुम्ही कोणत्या एजन्सीबरोबर काम करत असाल तर तुम्ही त्यांना मागच्या सीझनपेक्षा जास्त मानधन मागितले पाहिजे. कारण- तुम्ही जर असे केले नाही तर ज्या ब्रँडसाठी काम करता त्यांना वाटते की तुमची प्रगती होत नाही. आणि तुम्हाला जे मानधन दिले जाईल, त्यामध्ये मध्ये काम कराल, असा त्यांचा समज होतो”
“लॅक्मे फॅशन वीकसारखे शो हे सर्वाधिक मीडिया परफॉर्मिंग शो आहेत. कधीकधी बुकर मॉडेल्सना सांगतात की ते व्हायरल होण्याची शक्यता आहे किंवा प्रसिद्धी मिळू शकते. यामुळे लोक त्यांना पाहिजे तितके, मानधन मागत नाहीत. पण, त्या व्हायरल होणाऱ्या रीलमुळे तुमच्या रोजच्या जेवणाची सोय होणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.”
“जेव्हा तुम्ही मॉडेलिंग करता, तेव्हा तुम्ही योग्य प्रकारचे अन्न खाण्याला, डाएटिंग करण्याला प्राधान्य देता. तुमची दिनचर्या उत्तम ठेवणे, निरोगी राहणे हे कठीण असते. तुम्ही ज्या ब्रँडसाठी रँपवर चालता, ते तुम्हाला मिळणाऱ्य़ा मानधनापेक्षा तुम्हाला शंभरपट अधिक कमाई करत आहे. खूप उशीर होण्यापूर्वी कृपया सावधगिरी बाळगा”, असे रोशनी शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
रोशनी शर्माने शेअर केलेल्या पोस्ट आणि व्हिडीओला इतर मॉडेल्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यांना आलेले अनुभव, इंडस्ट्रीत मिळणारी वागणूक आणि समस्या याबद्दल वक्तव्य केले.
पुरुष मॉडेल्सना प्रत्येक शोसाठी दिले जाते ‘इतके’ मानधन
एनडीटीव्हीशी काही मॉडेल्सनी संवाद साधला. तेजय गिल म्हणाला, “मी असे काही कार्यक्रम केले आहेत जिथे मला सकाळी ९ वाजता ९:३० वाजताच्या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते आणि मला मानधन फक्त ६,००० रुपये दिले होते. अनेकदा तर तितके मानधनही दिले नाही. अनेकदा कपड्यांच्या फिटिंग्जसाठी पैसे दिले जात नाहीत. प्रवासाचा जो खर्च होतो, तो दिला जात नाही, वाईट प्रकारचे अन्न दिले जात. बऱ्याचदा आम्हाला स्वत:चे जेवण विकत घ्यावे लागते.”
पुढे तो असेही म्हणाला, “पुरुष मॉडेल्सना प्रति शो ६,०००ते ७,००० इतके कमी मानधन दिले जाते. पुरुष मॉडेल्ससाठी १५००० ते ३५ ००० आणि महिला मॉडेल्ससाठी २०००० ते५० ००० प्रति शो मानधन दिले गेले पाहिजे. मला एका जागतिक ब्रँडसाठी १२ तासांच्या शूटसाठी ३५,००० रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यामध्ये माझा चेहरा प्रिंट, सिनेमा, टीव्ही आणि डिजिटल अशा सर्व माध्यमामध्ये वापरला जाणार होता. मी त्याचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी माझे मानधन ८०,००० रुपयांपर्यंत वाढवले. पण, ते मानधन तरीही कमी आहे, कारण- ब्रँडचे बजेट स्पष्टपणे खूप जास्त होते. मग, पैसे कुठे जात आहेत? हा प्रश्न आहे.”तेजय असेही म्हणाला की स्टेजमागे जे फोटोशूट होते, त्याचे आम्हाला पैसे मिळत नाहीत.
२३ वर्षीय मॉडेल शिमी नाथन म्हणाली की आता ज्यांच्याकडे फोन आहे आणि काही फॉलोअर्स आहेत ते स्वतःला मॉडेल म्हणवतात. ब्रँड्स त्याचा गैरफायदा घेतात. ते आम्हाला प्रसिद्धीसाठी मोफत काम करण्यास सांगतात. पण फक्त प्रसिद्धी मिळाल्याने आपले पोट भरत नाही. रोजच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पैशांची गरज लागते.काम मिळवण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना आम्ही उपस्थितीत राहिले पाहिजे, असे एजन्सी आम्हाला सांगतात. पण. जर ब्रँडना आमचे सोशल मीडिया वापरायचे असेल तर त्यांनी जास्त पैसे दिले पाहिजेत.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या इंडस्ट्रीत काम करणारे ज्येष्ठ सौंदर्यतज्ज्ञ एल्टन जे फर्नांडिस म्हणाले, “अगदी १५-२० वर्षे काम करणाऱ्यांनाही मॉडेल्सना हँगरसारखे वागवले जाते.शोस्टॉपर म्हणून काम करणाऱ्या कलाकारांचे लाड केले जाते, त्यांना प्राधान्य दिले जाते, त्यांना चांगले मानधनही मिळते.” इंडस्ट्रीत घडणाऱ्या अशा गोष्टींबद्दल जर कोणी आवाज उठवला तर त्यांना काम मिळत नाही, असेही ते म्हणाले.
पुरुष मॉडेल्सना प्रत्येक शोसाठी दिले जाते ‘इतके’ मानधन; रोशनी शर्मासह इतर मॉडेल्स झाले व्यक्त