शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहेत. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच गाण्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करायचीही मागणी होताना दिसत आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची चातकासारखी वाट बघत आहेत. यंदा शाहरुखने आणि या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनची पद्धत बदलली आहे.
कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची संपूर्ण टीम या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतंच शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली.
आणखी वाचा : “मला गर्लफ्रेंड नाही मग…” चाहत्याच्या या विचित्र प्रश्नाला शाहरुख खानने दिलं त्याच्या खास शैलीत उत्तर
या सेशनमध्ये बऱ्याच लोकांनी शाहरुखला चित्र विचित्र प्रश्न विचारले आणि शाहरुखने त्यापैकी काही लोकांना ट्विटरवर उत्तरं दिली आहेत. एका ट्विटर युझरने शाहरुखला असाच एक विचित्र प्रश्न विचारला. शाहरुखला टॅग करत त्याने विचारलं की, “पठाण कोणाला कीस करणार” यावर शाहरुखने त्याला उत्तर दिलं की “आत्ता पठाण कीस करायला नव्हे, किक करायला आला आहे.” शाहरुखच्या या ट्विटवरसुद्धा लोकांनी मस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ट्विटमधून शाहरुखने त्याच्या चित्रपटात कोणताही किसिंग सीन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिका यांच्यात बरेच बोल्ड सीन्स दिसले असले तरी त्यांच्यात ऑनस्क्रीन कीस पाहायला मिळणार नाही हे नक्की झालं आहे.
चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असून पटापट शोज हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. याच दीपिका पदूकोण अॅक्शन मोडमध्ये आणि जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणासारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.