एखादी भूमिका करताना ती वास्तववादी वाटावी, यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना कधीकधी एखाद्या पात्राची मन:स्थिती योग्यरित्या मांडण्यासाठी ती भावना मनात आणावी लागते. अभिनेत्री ईशा कोप्पीकरने एका सिनेमातील तिचा अनुभव सांगितला आहे. चेहऱ्यावरचा राग दिसावा या प्रयत्नात तिला १५ वेळा थोबाडीत मारण्यात आली होती.
ईशा कोप्पीकरने १९९८ मध्ये आलेल्या ‘चंद्रलेखा’ या चित्रपटात अभिनेता नागार्जुनबरोबर काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने सांगितलं की एका सीनचे शूटिंग करताना नागार्जुनला तिने खरंच थोबाडीत मारायला सांगितलं होतं. पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव दृश्याला अनुरूप नव्हते त्यामुळे रिटेक घ्यावे लागले. या एका दृश्यासाठी तिला तब्बल १५ वेळा नागार्जुनने थोबाडीत मारली. शेवटी तिच्या चेहऱ्यावर व्रण उमटले होते आणि नागार्जुनने तिची माफी मागितली होती.
ईशा नागार्जुनला म्हणाली, “तू मला खरंच मार”
हिंदी रशशी बोलताना ईशा म्हणाली, “मला नागार्जुनने १५ वेळा कानशिलात मारली होती. मी एक पूर्णपणे समर्पित अभिनेत्री होते. त्यामुळे मला तो सीन अगदी खरा वाटावा असाच करायचा होता. जेव्हा तो मला मारत होता तेव्हा मला काहीच जाणवलं नाही. हा माझा दुसरा चित्रपट होता. मी त्याला म्हणाले, ‘नाग, तू मला खरंच मार.’ तो म्हणाला, ‘नाही, मी तुला मारू शकत नाही.’ मी म्हणाले, ‘मला ती भावना अनुभवायची आहे. मला आत्ता ती जाणवत नाहीये.’ त्यामुळे त्याने मला अगदी हळूवारपणे झापड मारली.”
ईशा कोप्पीकरने सांगितलं की त्यावेळी ती कॅमेऱ्यासमोर तिचा राग योग्य पद्धतीने व्यक्त करू शकत नव्हती, त्यामुळे सतत रिटेक घ्यावे लागत होते. “मी रागावलेली दिसावी, या प्रयत्नात मला तब्बल १५ वेळा नागने थोबाडीत मारली,” असं ईशा म्हणाली.

या सीनचे शूटिंग संपले तेव्हा चेहऱ्यावर व्रण उमटले होते आणि नागार्जुनने तिची माफी मागितली असं ईशाने सांगितलं. “माझ्या चेहऱ्यावर खरोखरच व्रण उमटले होते. शूटिंगनंतर तो बिचारा माझ्याजवळ येऊन बसला आणि वारंवार माफी मागत होता. मी त्याला म्हणाले, ‘तू माफी का मागतोय?'” अशी शूटिंगची आठवण ईशाने सांगितली.
ईशा कोप्पीकर कृष्णा कॉटेज, पिंजर, क्या कूल हैं हम आणि डॉन यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखली जाते. ती शेवटची २०२४ मध्ये अयालान या तमिळ चित्रपटात दिसली होती.