जॅकी श्रॉफ यांचा मुलगा व अभिनेता टायगर श्रॉफचे अनेक जास्त चित्रपट फ्लॉप राहिले आहेत. ‘हिरोपंती’मधून पदार्पण करणाऱ्या टायगरने फक्त ‘बागी’, ‘वॉर’, ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ असे मोजकेच हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच आलेले त्याचे ‘गणपत’, ‘मुन्ना मायकल’ आणि ‘हिरोपंती २’ यास काही चित्रपट फ्लॉप झाले. येत्या काळात तो ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. दरम्यान, मुलाच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले, जाणून घेऊयात.
‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले की हिट आणि फ्लॉप चित्रपट या इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. “मला वाटतं की त्याला (टायगरला) एका चांगल्या टेक्निशियनची आणि चांगल्या रिलीझची गरज आहे. कारण त्याच्याकडे सर्व काही आहे, तो एक अॅक्शन स्टार आहे. त्याच्या वयाच्या तुलनेत तो खूप मोठा आहे. मी त्याला म्हणतो, ‘जास्त विचार करू नकोस. काही चित्रपट चालतील, काही चालणार नाहीत आणि पुन्हा काही चालतील. हेच आयुष्य आहे,'” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?
ते पुढे म्हणाले, “मी २५० चित्रपट केले आहेत आणि त्यापैकी सर्वच हिट झाले असं नाही. त्यामुळे हिट फ्लॉप चालत राहतं. कारण कोणताही चित्रपट हा पूर्णपणे संपूर्ण टीमवर अवलंबून असतो, चित्रपट बनवणे हे एक टीमवर्क आहे. त्यामुळे निवांत राहायचं, फार टेन्शन घ्यायचं नाही.”
आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला हवं, असा सल्ला ते देतात. “प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही मिळत नाही, सर्व काही मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आपलं आरोग्य, कुटुंब आणि मित्र हे महत्त्वाचे आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे, त्यासाठी आपण कृतज्ञ असायला हवं. मी शेंगदाणे विकून, नंतर भिंतींवर पोस्टर चिकटवून, ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करून, मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये काम करण्यात आनंदी होतो आणि आता मी झाडं लावण्यात आनंदी आहे,” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
“मला जे काही काम मिळालं, ते मी केलं. मला आठवतं की मी सर्वात आधी शेंगदाणे विकले, नंतर मला भिंतींवर चित्रपटाचे पोस्टर चिकटवण्याचे काम मिळाले, मी एका कपड्याच्या दुकानात काम केले, नंतर एका ट्रॅव्हल एजन्सीत कामाला लागलो. मग मला कोणीतरी विचारलं, ‘मॉडेलिंग करशील का?’, मी ते केलं, मग कोणीतरी म्हटलं ‘तू चित्रपट करशील का? मी तेही केलं. मी स्वत:ला मिळेल ते काम करण्यासाठी तयार ठेवलं. मी प्रामाणिक आणि शिस्तप्रिय होतो, मला जे काही काम दिलं गेलं ते मी प्रामाणिकपणे केलं. मी फक्त काम करत राहिलो आणि कधीही कशाचाही ताण घेतला नाही,” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.