Jackie Shroff Chawl Memories : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांनी मुंबईतील एका चाळीत आयुष्याची ३३ वर्षे घालवली. जॅकी श्रॉफ आजही अनेकदा त्या चाळीला भेट देतात. आता त्यांनी चाळीत ज्या खोलीत ते राहायचे ती भाड्याने घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे.
जॅकी श्रॉफ यांचं बालपण फार हलाखीचं होतं. एकेकाळी त्यांनी शेंगदाणे विकले, चित्रपटाची तिकिटंही विकली होती. जॅकी श्रॉफ व त्यांचे कुटुंब मुंबईच्या तीन बत्ती चाळीत राहायचे. जॅकी या चाळीतच लहानाचे मोठे झाले. फिल्म इंडस्ट्रीत यश मिळवल्यानंतरही ते काही वर्षे या चाळीतच राहिले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॅकी यांनी चाळीबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
३३ वर्षे चाळीतील ज्या खोलीत घालवली, ती खोली भाड्याने घ्यायची आहे, पण घरमालक तयार होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. जॅकी श्रॉफ यांनी चाळीत राहण्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच चाळीत एक वेगळीच ऊर्जा आहे. अजूनही ते कधीकधी चाळीला भेट देतात, फिरतात आणि तिथे काही वेळ घालवतात, असं त्यांनी नमूद केलं.
घरमालक ती खोली भाड्याने देत नाहीये – जॅकी श्रॉफ
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांना विचारण्यात आलं की ते चाळीतील त्यांची खोली परत भाड्याने घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत का? उत्तर देत ते म्हणाले, “हो मी प्रयत्न करत आहे, पण मालक मला ती खोली परत देत नाही. त्याला वाटतं की त्याने ती खोली मला दिल्यास… आणि मी त्याला म्हणतो, ‘भावा, मी ती घेऊन पळून जाणार नाही’. तो मला ती खोली देत नाहीये. मी त्याला सांगितलं की या खोलीचं भाडं मी देईन. आता तिथे ४ जण राहत आहेत, ते जे भाडं देतात तेच मी तुला देईन, पण तो तयार होत नाहीये.”
भावाच्या निधनानंतर सोडली खोली
भावाच्या निधनानंतर आईने ती खोली सोडली होती, पण मनात अजून त्या जागेच्या आठवणी आहेत, असं जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं. “ती माझी खोली आहे. माझ्या भावाच्या निधनानंतर माझ्या आईने ती खोली सोडली. पण मला ती जागा जपायची आहे, तिथे काही वेळ घालवायचा आहे, त्या जागेची ऊर्जा अनुभवायची आहे. मी तिथे ३३ वर्षे घालवली आहेत. मला तिथले वातावरण खूप आवडते. मालक मला ती खोली देत नसला तरी मी कधीकधी तिथे जातो, संध्याकाळी बाल्कनीत उभा राहतो, पान खातो,” असं ते म्हणाले.