मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ जानेवारी रोजी जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या ‘जादूनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक मूळ हिंदी भाषेत आहे आणि याचा इंग्रजी अनुवादही करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लोकप्रिय लेखक, चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान जावेद अख्तर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी त्यांची मतं परखडपणे मांडली. नुकतंच शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. सेन्सॉर बोर्डच्या निर्णयावर आणि प्रमाणपत्रावर आपण विश्वास ठेवायला हवं असं जावेद अख्तर म्हणाले.

आणखी वाचा : “ही आपली संस्कृती…” ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांची ‘पठाण’वर टीका, सेन्सॉर बोर्डालाही सुनावले खडेबोल

याबरोबरच प्रत्येक धर्माच्या वेगळ्या आणि स्वतंत्र सेन्सॉर बोर्डावरही जावेद अख्तर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. जगतगुरु शंकराचार्य यांनी वेगळ्या धर्म सेन्सॉर बोर्डवर केलेल्या वक्तव्यावर जावेद अख्तर म्हणाले, “मी त्यांच्या वक्तव्याचा विरोध करणार नाही. असं सेन्सॉर बोर्ड जरूर बनायला हवं, जर मध्यप्रदेशात सेन्सॉर बोर्ड होऊ शकतं तर मग ही गोष्टही व्हायलाच हवी. यात काय चुकीचं आहे?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जावेद अख्तर यांनी चित्रपट उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटी निर्माणाबाबतही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “उत्तर प्रदेश हे खूप मोठं राज्य आहे जिथे हिंदी आणि उर्दूभाषिक लोकं राहतात. तिथे फिल्मसिटी बनत असेल तर ते चांगलंच आहे. याचा अर्थ म्हणजे मुंबईतून फिल्मसिटी हटवणं असा होत नाही. परदेशातही असं होतं त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट बनणार असतील तर ते चांगलंच आहे.” जावेद अख्तर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बऱ्याच स्टार मंडळींनी हजेरी लावली. तब्बू, फराह खान, उर्मिला मातोंडकर, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर या कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले.