Rupali Ganguly on Jaya Bachchan Video : ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये चिडल्याचं पहायला मिळत आहे. सेल्फी घेण्यासाठी जवळ आलेल्या चाहत्याला धक्का दिल्याचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे त्यांच्यावर अनेकजण टीका करत आहेत.
जया बच्चन यांना याआधीही अशाच प्रकारे चिडताना पाहिलं गेलंय, परंतु आता ज्याप्रकारे त्यांनी चाहत्याला धक्का दिला आणि त्याला वागणूक दिली, ते अनेकांना पटलं नाही. त्यामुळे हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मंडळी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेत्री रूपाली गांगुली यांनीसुद्धा जया बच्चन यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
एका कार्यक्रमात रुपाली गांगुली यांना जया बच्चन यांचा चाहत्याला धक्का दिल्याचा हा व्हिडीओ दाखवण्यात आला. तेव्हा त्या यावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “मी माझ्या आईबरोबर जया जींचा ‘कोरा कागज’ हा चित्रपट पाहिला होता, ज्यामध्ये वडिलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालं होतं. ‘कोरा कागज’मधील जयाजींचा अभिनय पाहून खरंतर मी अभिनय करायला शिकले. मला त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही.”
रुपाली यांच्याबरोबरच अभिनेत्री आणि कंगणा रणौत यांनीसुद्धा जया बच्चन यांच्या व्हिडीओवर टीका केली होती. जया बच्चन यांच्या व्हिडीओ शेअर करत त्यांनी “ही सर्वाधिक विशेषाधिकार मिळवलेली महिला आहे. लोक यांचे नखरे आणि अशी वागणूक शन करतात, कारण त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. त्यांचं वागणं खूपच लज्जास्पद आहे” असं म्हटलं होतं.
जया बच्चन यांनी आधी दिलेल्या मुलाखतीत त्यांना फोटो काढायला का आवडत नाही, यामागचं कारण सांगितलं होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी जया बच्चन त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर कॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर उभ्या होत्या. तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या बाजूला येऊन मोबाइलमध्ये त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला पाहताच जया बच्चन लगेच धक्का देतात आणि “हे काय करताय तुम्ही?” असं ओरडतात. त्यानंतर तो व्यक्ती जया बच्चन यांची माफी मागतो.