Jaya Amitabh Bachchan Wedding Story: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया भादुरी यांचे लग्न खूप साधेपणाने झाले होते. लग्नातील विधींबद्दल अमिताभ बच्चन यांचे वडील व महान कवी हरिवंशराय बच्चन यांनी स्वतः त्यांच्या ‘इन द आफ्टरनून ऑफ टाइम’ या आत्मचरित्रात लिहिलं होतं.

अमिताभ व जयाच्या लग्नातील सर्व विधी इतक्या साधेपणाने करण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले होते. अमिताभ बच्चन ‘नमक हराम’, ‘सौदागर’ आणि ‘जंजीर’ सारखे चित्रपट करून बॉलीवूडचे मोठे स्टार झाले होते. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. लग्नात चाहत्यांची गर्दी होऊ नये म्हणून फक्त मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करायचं, असं ठरलं होतं.

“जयाच्या कुटुंबियांनी लग्नाचा कार्यक्रम बीच हाऊसमधील फ्लॅटमध्ये न ठेवता मलबार हिल्समधील स्कायलार्क बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका मित्राच्या घरी आयोजित करायचं ठरवलं,” असं पुस्तकात लिहिलंय. या लग्नाची माहिती अमिताभ यांच्या शेजाऱ्यांनाही नव्हती. बच्चन कुटुंबाने फक्त मोजक्याच लोकांना लग्नासाठी निमंत्रित केलं होतं, त्यामध्ये जगदीश राजन व त्यांचे कुटुंबीय आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांचे कुटुंब होते. इंदिरा गांधी या लग्नाला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी संजय गांधींना अमिताभ-जया यांच्या लग्नाला पाठवलं होतं.

जया यांच्याव्यतिरिक्त कोणीच आनंदी नव्हतं…

हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात पुढे लिहिलंय, “जयाच्या आई-वडिलांना बंगाली पद्धतीने लग्न व्हावं असं वाटत होतं, आमचा त्यावर कोणताही आक्षेप नव्हता. सर्वात आधी वर-पूजा होती, ज्यात वराचे मान-सन्मान केला जातो, त्यासाठी जयाचे वडील आमच्या घरी भेटवस्तू घेऊन आले आणि एक छोटासा विधी पार पडला.” यानंतर बच्चन कुटुंबीय हा विधी करण्यासाठी बीच हाऊसमध्ये गेले होते, परंतु तिथे वधू जया यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही आनंदी दिसत नव्हतं.

Amitabh bachchan Jaya Bachchan wedding photos 6
अमिताभ बच्चन व जया यांच्या लग्नातील फोटो (सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

साधेपणाने केलेलं वरातीचं स्वागत

हळदी समारंभानंतर बच्चन कुटुंबीय वरात घेऊन स्कायलार्क बिल्डिंगमध्ये गेले, तिथे अगदी साधेपणाने त्यांचे स्वागत करण्यात आले. “आम्ही लिफ्टने वर गेलो, तिथे जया नववधूच्या पोशाखात होती. त्यावेळी मी पहिल्यांदाच तिला लाजताना पाहिलं, हा सौंदर्याचा एक खास पैलू आहे, असं तेव्हा जाणवलं,” असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

वरातीत गेलेले लोक रात्रीच्या जेवणानंतर परतले आणि कुटुंबातील सगळे तिथेच थांबले होते. “आम्ही तिथून निघण्यासापूर्वी मी माझ्या नवीन सूनेच्या वडिलांचे अमितसारखा जावई मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. मला वाटलं होतं की तेही जयासाठीही असंच काहीतरी बोलतील, पण ते म्हणाले ‘माझं कुटुंब बरबाद झालं आहे’,” असं हरिवंशराय बच्चन यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

अमिताभ बच्चन आणि जया यांचे लग्न ३ जून १९७३ रोजी झाले होते. त्यांच्या लग्नाला ५२ वर्षे झाली आहेत.